krushikranti.com
11-01-19


शाश्‍वत उत्पन्न मिळवून देणारे पीक अशी एरंडाची नवी ओळख तयार होत आहे. औषधी वनस्पती असल्याने एरंडाला बाजारात मागणीही चांगली असते. विशेषत: एरंडीचे तेल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून खरेदी केली जाते. एरंडीची पाने 'इरी रेशिम किड्यांसाठी' एक उत्तम अन्न आहे.तसेच याचे खोड, बियाणे यांचा देखील विविध ठिकाणी वापर करण्यात येतो.


जमिनीचा प्रकार
एरंडीचे पीक सर्वसाधारणपणे लागवडीखाली असलेल्या सर्व प्रकारच्या जमिनीत येऊ शकते. भारी जमिनीत हे पीक अधिक कालावधी घेऊन जास्त उत्पादन देते.

हवामान
एरंडी हे पीक अवर्षणग्रस्त प्रतिसाद देत असल्याने ४० ते ५० सेंमी पर्यंत पाऊस पडणाऱ्या भागातसुद्धा हे पीक चांगले येऊ शकते. एरंडीस उष्ण व कोरडी हवा मानवते.

पिकाची जात
गिरीजा, व्हीआय - ९,अरूणा,भाग्य,सौभाग्य,एककेएम - ७३,डीसीएस (ज्योती) - ९,जी अेयू सी. एयू -२ , जीसीएच -३२

लागवड
जून महिन्यात पावसाला सुरू झाल्यावर जमिनीत पुरेशी ओल व वापसा असताना एरंडीची पेरणी इतर पिकांबरोबर करावी. पाऊस उशिरा सुरू झाल्यास पेरणी ऑगस्टपर्यंत करण्यास हरकत नाही.रब्बी व बागायती पिकांसाठी पेरणी सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत करावी. पेरणी करताना एका ठिकाणी २ बिया ५ ते ७.५ सें. मी. खोलीवर लावात. पेरणी केल्यानंतर १५ दिवसांनी विरळणी करून प्रत्यके ठिकाणी एकाच रोप ठेवावे. हेक्टरी झाडांची संख्या ३०,००० ते ४०,००० असावयास पाहिजे.

खत व्यवस्थापन
एरंडी पीक नत्र खताला चांगला प्रतिसाद देत असल्याकारणाने जमिनीच्या मगदुराप्रमाणे नत्राची मात्रा दोन/ तीन हप्त्याने द्यावी.एरंडी पिकाच्या मुळ्या खोलवर जात असल्यामुळे ते अन्नशोषण करणारे पीक आहे. म्हणून हमखास उत्पादनासाठी माती परीक्षणांवर आधारीत अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे गरजेचे आहे. अन्नद्रव्यांचा पुरवठा करताना शिफारस केलेल्यापैकी किमान २५% पुरवठा सेंद्रिय खतातून करावा.

पाणी व्यवस्थापन
एरंडी हे पीक जास्त पाण्याच्या प्रत्येक अवस्थेला फारच संवेदनशील आहे. यामुळे पिकाच्या आर्थिक उत्पादनासाठी जमिनीत उपलब्ध पाणी, योग्य वाणांचा वापर त्याचप्रमाणे पाणी देण्याची वेळ व पिकाची वाढीची अवस्था या सर्व बाबी विचारात घ्याव्यात.

रोग नियंत्रण
उंट अळी व बोंडे पोखरणाऱ्या किडी दिसू लागताच मोनोक्रोटोफॉस (०.०५%) किंवा कार्बारील (०.१५%) किंवा क्विनॉलफॉस यांचा १० -१५ दिवसांच्या अंतराने २०० मिली ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी २ - ३ वेळा गरजेनुसार फवारणी करावी किंवा क्विनॉलफॉस यांचा १० -१५ दिवसांच्या अंतराने २०० ते ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी २ - ३ वेळा गरजेनुसार फवारणी करावी.

उत्पादन
एरंडीचे घड पक्व झाल्यावर पूर्णपणे वाळल्यावर ते तोडून घ्यावेत. ४ - ५ दिवस वाळवावेत. वाळलेले घड काठीने किंवा मोगारीने बडवून बिया वेगळ्या कराव्यात व वारा देऊन स्वच्छ कराव्यात. जिरायती पिकाची घड काढणी साधारणपणे २ - ३ वेळा करावी. तसेच बागायती पिकाची घड काढणी ४ - ५ वेळा करावी. अलीकडे मळणीसाठी थ्रेशर उपलब्ध आहेत. मोठ्या क्षेत्रावर जर एरंडीचे पीक असेल तर मळणीसाठी थ्रेशरचा वापर करावा.