krushikranti.com
25-06-18


खुरांच्या आजाराकडे वेळीच लक्ष द्या


जनावरांना खुरात झालेल्या जखमेमुळे रोगजंतूचा खोलवर शिरकाव होऊन अनेक गंभीर आजार संभवू शकतात व जनावर काम करू शकत नाही. त्यामुळे खुराच्या आजाराकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.


पावसाळ्यात जनावरांना बरेच आजार होतात यात प्रामुख्याने खुरांच्या आजारांचा समावेश करता येईल. खुरामध्ये झालेल्या जखमामुळे जनावर लंगडते व वजन पेलू शकत नाही. यामुळे कामाचा खोळंबा होतो; तर दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन कमी होते. यासाठी अशा जखमांचा वेळेवर उपचार करणे गरजेचे आहे.


कारणे

खुरामधील जखम ही दोन खुराच्या आतील कातडीस होते किंवा खूर आणि कातडी यांच्या जोडावर होते.

एखाद्या वस्तूचा मार लागणे.

खुरात धारदार खडा किंवा काटा टोचणे

शेतात चरत असताना ऊस, हायब्रीड किंवा इतर कोणत्याही कापलेल्या पिकाचे कापलेले धसकट लागणे यामुळे खुरात जखम होऊ शकते.

पावसाळी वातावरण, सतत खुरांचा ओलसरपणा.

चिखल व दलदल यांचा संपर्क खुरास आल्यावर खुरातील व त्या जवळची कातडी ओली होऊन मऊ होते व वर सांगितलेल्या कोणत्याही एका कारणाने थोडाही मार लागला की खुरास जखम होते.

जखम झाल्यावर खुरामध्ये अनेक जिवाणूंचा प्रादुर्भाव जखमेतून होतो व अनेक दुय्यम आजार होतात.लक्षणे


खुरास जखम झाल्यावर सर्वांत महत्त्वाचे लक्षण म्हणजे जनावर लंगडते.

जखम झाल्यास जवळचा भाग सुजतो.

जनावरास भयंकर वेदना होतात.

खुरातील व खुरावरील कातडीस भयंकर सूज येते.

जनावर पाय टेकू शकत नाही.

जनावरास ताप येतो.

दूध उत्पादनावर परिणाम होतो.

खुराच्या जखमेत २ ते ३ दिवसांत पू भरतो.

बऱ्याचदा जखमेच्या ठिकाणी गळू होतो.

कितीही प्रयत्न केला तरी माती/चिखल खुराच्या संपर्कात येते व यामधून जखमेत रोगजंतू शिरतात.

जखमेची दुर्गंधी येते.

जखमेजवळील कातडी मऊ होते व थोड्याही धक्क्याने फाटते.

खुरात रक्तस्त्राव होतो.

खुराच्या टाचेचा भाग मऊ होतो.

बाऱ्याचदा लेमिनायटीस नावाचा आजार होतो.

जुन्या जखमात खुरात व्रण होतात.


उपचार


खुरांना जखम झाली असेल तर पहिली काळजी म्हणजे खुरांची स्वच्छता करणे होय.

जनावरे बांधण्याच्या जागेची स्वच्छता व कोरडेपणा अत्यंत आवश्यक आहे.

खूर व जनावरे बांधण्याची जागा अस्वच्छ असेल किंवा चिखलाची असेल तर उपचाराचा उपयोग होत नाही.

जनावरांच्या खुरांना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रथम पोटॅशिअम परमँगनेट किंवा जंतूनाशकाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. पाणी थोडे गरम वापरले तरी चालते. यानंतर जखमेस कॉपर सल्फेटच्या ५ टक्के द्रावणाने किंवा पावडरने ड्रेसिंग करावे व पट्टी बांधावी.

जनावरास पूर्ण आराम द्यावा.

जनावरांना तज्‍ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविके, वेदनाशामक व जीवनसत्त्वांची इंजेक्शन द्यावीत.

जनावराची वाढलेली खुरे कापावीत.

जनावराचे खूर नेहमी कोरडे राहील याची काळजी घ्यावी.

जनावरांना दररोज ५० गरम क्षार मिश्रणे द्यावीत जेणेकरून झिंकचा पुरवठा होईल व खुरांची वाढ होईल.

जनावरास सकस आहार द्यावा.

वाढलेली खुरे वेळोवेळी कापून घ्यावीत.


Ref:- agrowone.com