krushikranti.com
24-09-18दुर्गंधी छुमंतर करणारे ‘जीवांमृत

 - तरुण भारत


वेंगुर्ल्यातील युवकाचे अभूतपूर्व कार्य

 : पर्यावरणप्रेमींना सुखद धक्का : अनेक ठिकाणी यशस्वी प्रयोग हो! खरंच आहे हे. तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका, पण हे प्रत्यक्ष पाहिलेले अगदी शंभर नंबरी सत्य आहे. वातावरण प्रदूषित करणारी व रोगराई पसरविणारी सार्वजनिक ठिकाणची शौचालये, मुतार्या मलमुक्त, दुर्गंधीमुक्त आणि त्याही पुढे जाऊन अवघ्या काही दिवसांत डासमुक्त देखील करता येणे शक्य होणार आहे. एवढेच कशाला, तर कचरा डेपोची समस्याही कायम स्वरुपी निकाली काढता येणे शक्य आहे. वेंगुर्ले येथील अजित परब या पर्यावरण प्रेमी आर्किटेक्ट युवकाने यशस्वी प्रयोग करून हे सिद्ध करून दाखविले आहे. कृषी ऋषी म्हणून ओळखल्या जाणाऱया *पद्मश्री श्री सुभाष पाळेकर* यांनी जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी बनविलेल्या अनोख्या बॅक्टेरियायुक्त जीवामृताच्या सहाय्याने त्याने हा प्रयोग यशस्वी करीत पर्यावरणप्रेमींना सुखद धक्का दिला आहे.

जल व वायू प्रदूषणाची  समस्या

 कचरा, जलप्रदूषण आणि वायू प्रदूषण ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. जसजशी लोकसंख्या वाढत चालली आहे, तसतशी गावे म्हणा, शहरे म्हणा वा महानगरांमध्ये ही समस्या अतिगंभीर रुप धारण करू लागली आहे. सांडपाणी, विषारी रसायनेयुक्त पाण्यांमुळे तुंबलेली गटारे, नाले, भरून वाहणाऱया शौचालयांच्या टाक्या, सार्वजनिक मुतार्यांची दुर्गंधी, दिवसेंदिवस वाढत जाणाऱया कचरा डेपोंची वाढती समस्या यामुळे मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होऊन मानवी जीवन अक्षरश: रोगमय बनून गेले आहे. या समस्येवर उपाय शोधण्याचे प्रयत्न हे सुरुच आहेत. स्वच्छ भारत अभियान, हागंदारी मुक्ती, प्लास्टिक मुक्ती अभियान हे कार्यक्रम हा त्यातलाच एक भाग आहे. पण या अभियानाचे यश हे प्रत्यक्षापेक्षा कागदावरच अधिक प्रभावीपणे रंगवले जाते. वरील प्रकारच्या समस्यांना कायमस्वरुपी मुक्ती देण्यासाठी अधिक परिणामकारक अशा संशोधनाची गरज होती आणि तशा प्रकारचे संशोधन करण्यात वेंगुर्ले येथील अजित परब हय़ा पर्यावरणप्रेमी आर्किटेक्ट युवकाने अभूतपूर्व असे यश मिळविले आहे.

दुर्गंधी, सांडपाणी व कचरा प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली

अजितने जीवामृत नावाचे असावापर केला आहे की जे एकदा का गटारात, नाल्यात वा शौचालयांच्या टाक्यांमध्ये सोडले, की प्रदूषित पाण्यातून निर्माण होणाऱया दुर्गंधीची निर्मिती तात्काळ तर थांबणार आहेच. त्याचबरोबर पाण्यातील मलयुक्त घटक, विषारी घटक व प्रदूषणयुक्त घटक हळूहळू नष्ट होऊन शुद्ध झालेले पाणी तात्काळ जमिनीतच मुरणार आहे. एवढेच नव्हे, तर कचरा डेपोंमधील जैविक कचऱयावर (प्लास्टिक, काच व धातू सोडून) हे द्रव्य फवारले, तर अवघ्या काही दिवसांत कचऱयापासून निर्माण होणारी असहाय्य दुर्गंधी नाहीशी होईल. त्याचबरोबर अवघ्या दोन ते तीन महिन्यांत संपूर्ण कचरा आश्चर्यकारकरीत्या अत्यंत सुपिक अशा मातीत रुपांतरीत होऊन जाईल. अजित परबच्या जीवामृताच्या वापराने हे सिद्ध करून दाखवलंय. सावंतवाडीतील कचरा डेपोवर हा प्रयोग यशस्वी झालाय. तर वेंगुर्ले येथील काही शौचालये, मुतार्या शहरातील, बाजारातील सार्वजनिक शौचालये, मुतार्या मच्छीमार्केट तसेच खासगी वसाहत्यांमध्ये हे प्रयोग भलतेच यशस्वी झाले आहेत.

 सावंतवाडीतील कचरा डेपोवर हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी या युवकाची पाट थोपटून त्याच्यावर आता संपूर्ण सावंतवाडी शहर प्रदूषणमुक्त करण्याची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.

या अनोख्या संशोधनात यश मिळाल्यानंतर अजितने मात्र या जीवांमृताचे श्रेय घेण्यास प्रामाणिकपणे नकार दिला आहे. ‘तरुण भारत’शी बोलताना अजित म्हणाला, जीवांमृत ही कृषीतज्ञ पाळेकरांची निर्मिती आहे. ते या जीवांमृताचा वापर नापिक जमीन पुन्हा सुपिक बनविण्यासाठी करतात. मी थोडा वेगळय़ाप्रकारे विचार करून या जीवांमृताचा वापर कचरा, सांडपाणी, मैलामुक्त पाणी आणि दुर्गंधी नष्ट करण्यासाठी करून पाहिला आणि त्यात मला यश मिळाले. या जीवांमृताचा वापर मी थोडय़ा वेगळय़ा प्रकारे केला एवढेच काय ते माझे श्रेय असे मी म्हणेन. माझ्या या संशोधनाचे पेटंट घेण्याचा विचार मी मुळीच केलेला नसून माझे हे संशोधन मी समाजाला अर्पण केले आहे. या संशोधनातून प्रदूषणमुक्ती ही होईलच. त्याचबरोबर जीवांमृत निर्मितीच्या माध्यमातून रोजगार निर्मितीही होऊ शकते, असा दावा अजितने केला. सध्या हे जीवांमृत 10 रुपये लिटर या दराने पडत असून भविष्यात निर्मिती वाढली, तर ते कमी देखील होऊ शकते, असे तो म्हणाला.

काय आहे हे जीवांमृत ?

जीवांमृत’ असे नामकरण करण्यात आलेले हे जीवांमृत गोमुत्र, शेण, गुळ आणि बेसन यांचे एक द्रवरुप मिश्रण आहे. यातून विशिष्ठ प्रकारचे बॅक्टेरिया तयार होतात. जे दुर्गंधी निर्माण करणाऱया प्रक्रियेतील बॅक्टेरियांचा नाश करतात. तसेच प्रदूषण पसरवणारी सडण्याची प्रक्रिया बंद करून ते कुजण्याच्या प्रक्रियेला सहाय्य करतात. या कुजण्याच्या प्रक्रियेमुळे मैलामुक्त पाण्यातील मैल्याचे पाण्यातच विघटन होऊन तो नष्ट तर होतोच. त्याचबरोबर त्या पाण्यातील विषारी घटकही नष्ट होऊन शुद्ध झालेले ते पाणी आपोआपच जमिनीत मुरते. तसेच या पाण्याचा जमिनीलाही काही अपाय होत नाही. उलट जमीन अधीक सुपिक बनते. एवदा का हे जीवांमृत सांडपाण्यात सोडले की मग त्या जीवांमृतातील बॅक्टेरिया प्रचंड वेगाने वाढत जातात. आणखी एक धक्कदायक बाब म्हणजे या जीवांमृताच्या शिडकाव्यामुळे डासांची उत्पत्ती कायमस्वरुपी थांबते. कचर्यावर हे औषध शिडकले, तर कचऱयाचे तात्काळ मातीत रुपांतर होते. त्यामुळे या जीवांमृतामुळे दुर्गंधीची समस्या कायमस्वरुपी ही संपतेच. त्याचप्रमाणे जलप्रदूषण थांबून रोगराईला आळा बसतो...!!!