krushikranti.com
18-08-18


पालक ही अतिशय लोकप्रिय पालेभाजी असून या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर करता येते. तसेच ह्या भाजीला सतत मागणी असते. पालकातील पोषणमुल्ये लक्षात घेता पालकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे.

तक्ता :

पालकाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटक
अन्नघटक प्रमाण (0%) अन्नघटक प्रमाण (0%)
कार्बोहायड्रेसटस् 86 प्रोटीन्स् 3.4
पाणी 86 फॅटस् 0.8
तंतूमय पदार्थ 0.7 खनिजे 2.2
फॉस्फरस 0.03 कॅल्शियम 0.38
लोह 0.02 जीवणसत्व अ 9770
जीवनसत्व क 0.07 उष्मांक 26
महत्व : पालकाच्या भजीत अ आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. तसेच प्रोटीन्स आणि कॉल्शियम, लोह, फॉस्फरस इत्यादी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. पालकाचा उपयोग भाजी, आमटी, सूप, इत्यादीमध्ये करतात.पालकाची भाजी काही प्रमाणात सारक आहे.
हवामान आणि जमीन : पालक हे कमी दिवसात तयार होणारे हिवाळी पीक असल्यामुळे महाराष्ट्रात कडक उन्हाळ्याचे 1-2 महिने वगळून वर्षभर पालकाची लागवड करता येते. थंड हवामानात पालकाचे उत्पादन जास्त येऊन दर्जा चांगला राहतो तर तापमान वाढल्यास पीक लवकर फुलोर्‍यावर येते आणि दर्जा खालावतो. पालकाचे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते. खारवट जमिनीतही पालकाचे पीक चांगले येऊ शकते. हलक्या जमिनीत पीक चांगले येते. ज्या खारवट जमिनीत इतर पिके येऊ शकत नाहीत तेथे पालक घेता येते.
उन्नत जाती : पालकाच्या अनेक स्थानिक जाती असून त्यांचा वापर निरनिराळ्या भागात करतात. पालकाच्या काही सुधारीत जाती पुढीलप्रमाणे आहेत.
(1) ऑलग्रीन : पालकाची ही जात भारतीय कृषि संशोधन संस्था, नवी दिल्ली येेथे विकसित करण्यात आली आहे. ह्या जातीची पाने सारख्या आकाराची, कोवळी आणि हिरवी असतात. ह्या जातीची उत्पादन हेक्टरी 12.5 टन इतके येते. आणि हिवाळी हंगामातील लागवडीत 15 ते 18 दिवसांच्या अंतराने 3-7 वेळा पानांची कापणी करता येते.
(2) पुसा ज्योती : पालकाची ही नवीन जात निवड पद्धतीने भारतीय कृषि संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे विकसित करण्यात आली आहे. ह्या जातीची पाने मोठी, जाड, लुसलुशीत, कोवळी, ज्योतीच्या आकाराची असून त्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम, लोह आणि क जीवनसत्वाचे प्रमाण ऑलग्रीन ह्या जातीपे़क्षा जास्त असते. ही जात लवकर फुलावर येत नाही आणि हिवाळ्यात 8-10 कापण्या मिळतात. महाराष्ट्रात ही जात चांगल्या प्रकारे येते या जातीचे उत्पादन हेक्टरी 15 टनांपर्यत मिळते.
(3) पुसा हरित : ही जात भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे विकसित करण्यात आली आहे. ही जात जोमदार उभट वाढते. ह्या जातीची पाने हिरवी, लुसलुसीत, जाड आणि भरपूर मोठ्या प्रमाणात येतात. या जातीच्या पानांच्या 3-4 कापण्या मिळतात आणि ही जात लवकर फुलावर येत नाही. या जातीची लागवड सप्टेंबर पासून फेब्रुवारीपर्यंत करता येते. या जातीचे उत्पादन हेक्टरी 10 टनापर्यंत मिळते.
लागवड हंगाम : महाराष्ट्रातील हवामानात पालकाची लागवड जवळजवळ वर्षभर करता येते. खरिप हंगामातील लागवड जून-जुलै मध्ये आणि रब्बी हंगामातील लागवड सप्टेंबर-ऑक्टोंबर मध्ये केली जाते. भाजीचा सतत पुरवठा होण्यासाठी 10-15 दिवसांच्या अंतराने हप्त्या हप्त्याने बियांची पेरणी करावी.
लागवड पद्धती : पालक हे कमी दिवसात तयार होणारे पीक असल्यामुळे जमिनीच्या मगदुरानुसार योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करून बी फोकून पेरावे आणि नंतर बी मातीत मिसळून हलके पाणी द्यावे. जमीन भारी असल्यास वाफसा आल्यावर पेरणी करावी. बी ओळीत पेरताना दोन ओळीत 25-30 सेंमी. अंतर ठेवावे. फार दाट लागवड केल्यास पिकाची वाढ कमजोर होऊन पानांचा आकार लहान राहतो आणि पिकाचा दर्जा खालावतो. लागवडीपूर्वी बियाण्याला थायरम ह्या बुरशीनाशकाची 2 ग्रॅम दर किलो बियाण्याला ह्या प्रमाणात प्रक्रिया करावी. त्यामुळे मर रोगाला प्रतिबंध होतो. पालकाच्या एक हेक्टर लागवडीसाठी 25-30 किलो बियाणे लागते.
खते आणि पाणी व्यवस्थापन : पालक हे कमी कालावधीचे पीक असते. तरी हिरव्या टवटवीत पानांवर पिकाचे उत्पादन व प्रत अवलंबून असल्यामुळे पालकाच्या पिकाला नत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो. तसेच पिकाला पाण्याचा नियमित पुरवठा करून जमिनीत ओलावा राखणे आवश्यक आहे.
पालकाच्या पिकाला जमिनीच्या मगदुरानुसार हेक्टरी 10 गाड्या शेणखत, 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे. शेणखत पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत मिसळून द्यावे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश 1/ नत्र पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेले नत्र 2 समान भागात विभागून पहिल्या आणि दुसर्‍या कापणीच्या वेळी द्यावे. ज्या जातीमध्ये दोनपेक्षा जास्त कापण्या करता येतात तेथे प्रत्येक कापणीनंतर हेक्टरी 20 किलो नत्र द्यावे.
पानांतील हिरवेपणा अधिक चांगल्या येऊन उत्पादन वाढविण्यासाठी बी उगवून आल्यानंतर 15 दिवसांनी आणि प्रत्येक कापणीनंतर 1.5% युरिया फवारावा. बियांच्या पेरणीनंतर लगेच पाणी द्यावे किंवा वाफसा आल्यानंतर पेरणी करावी. त्यामुळे बियांची उगवण चांगली होते. त्यानंतर पिकाला नियमित पाणी द्यावे. हिवाळ्यात पालकाच्या पिकाला 10-12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. काढणीच्या 2-3 दिवस आधी पिकाला पाणी द्यावे त्यामुळे पाने टवटवीत राहून पिकाचा दर्जा सुधारतो.
महत्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण : पालकावर मावा, पाने कुरतडणारी अळी आणि भुंगेरे ह्यांचा उपद्रव होतो. ह्या किडीच्या नियत्रंणासाठी पीक लहान असतानाच 8-0 दिवसाच्या अंतराने 15 मिली. मॅलॅथिऑन (50% प्रवाही) 10 लिटर पाण्यात मिसळून फवरावे. काढणीच्या 8-10 दिवस अधी फवारणी करू नये.
पालकावर मर रोग, पानांवरील ठिपके, तांबोरा आणि केवडा या रोगाचा प्रादुर्भाव होतो. मर रोगामुळे उगवण झाल्यावर रोपांची मर होण्यास सुरूवात होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्याचा योग्य निचरा करावा आणि पेरणीपूर्वी बियाण्यावर थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. हवेतील आर्द्रता वाढल्यास पानांवर गोल करड्या रंगाचे बांगडीच्या आकाराचे डाग पडतात. या बुरशीजन्य रोगामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी ताम्रयुक्त बुरशीनाशकाची उदा. ब्लॅयटॉक्स किंवा कॉपरऑक्झिक्लोराईड 10 लिटर पाण्यात 20 ग्रॅम या प्रमाणात मिसळून फावरणी करावी.
केवडा आणि तांबोरा रोगांचा फारसा उपद्रव होत नाही आणि शेतातील ओलावा नियंत्रित ठेवल्यास ह्या रोगाना आळा बसतो. तसेच गंधकयुक्त वेन्टासूल, सल्फेेक्स इत्यादी आणि ताम्रयुक्त ब्लायटॉक्स या बुरशीनाशकांची फवारणी केल्यास या रोगांचे नियंत्रण होते.
काढणी, उत्पादन आणि विक्री : पेरणीनंतर सुमारे 1 महिन्याचे पालक कापणीला तयार होतो. पालकाची पूर्ण वाढलेली हिरवी कोवळी पाने 15-30 सेंटीमीटर उंचीची झाल्यावर पानांच्या देठाचा जमिनीपासून 5-7.5 सेंटीमीटर भाग ठेवून वरील भाग खुडून अथवा कापून घ्याव आणि पानांच्या कापण्या कराव्यात कापणी करतानाच खराब रोपे वेगळी काढून जुड्या बांधाव्यात. काढणीनंतर पालक लगेच बाजारात पाठवावा. जुड्या उघड्या जागेत रचून वरुन झाकून घेऊन किंवा बांबूच्या टोपलीच्या खाली आणि वर कडूनिंबाच्या पाला ठेवल्यास पालक लवकर खराब होत नाही. वाहतुकीत जुड्यांवर अधूनमधून थंड आणि शिंपडल्यामुळे पानांचा तजेलदारपणा टिकून राहातो. मात्र पाणी जास्त झाल्यास सडण्याची क्रिया सुरू होते. म्हणून जुड्यांवर जास्त प्रमाणात पाणी मारू नये. पालकाचे उत्पादन पिकाच्या लागवडीची वेळ, जात, कापण्या आणि पिकाची योग्य काळती ह्यांवर अवलंबून असते. सर्वसाधारपणे हेक्टरी 10-15 टन एवढे उत्पादन मिळते. शिवाय बियाण्याचे उत्पादन 1.5 टनांपर्यंत मिळू शकते.

Ref:-digitalbaliraja.com