krushikranti.com
09-01-19ब्रोकोली हें रब्बी हंगामातील पीक आहे. या मध्ये औषधी गुणधर्मा मध्ये कॅन्सर वर गुणकारी आहे. फास्ट फूड च्या जमान्यात ब्रोकोली सूप, सॅलेड, बर्गर या मध्ये वापर केला जातो. महाराष्ट्रातील पाचगणी, महाबळेश्‍वर, प्रतापगड आदी भागांत उन्हाळ्यातही लागवड यशस्वी होते. बाजारात याला चांगली मागणी आहे .

जमिनीचा प्रकार
रेताड,मध्यम,काळी,निचऱ्याची जमीन या पिकास चांगली असते.अति हलकी,क्षारयुक्त, चोपण,पाणथळ जमिनीत या पिकाची लागवड करू नये.

हवामान
हिवाळी हंगामात लागवड फायदेशीर असते. ज्या भागात पावसाळ्यात पावसाचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणीही लागवड करता येते. दिवसा २० ते २५ अंश से.तापमान रोपांची वाढ होण्यासाठी आवश्‍यक असून, गड्डा तयार होते वेळी तापमान १५ते२० अंश से.असणे जरुरीचे आहे.

पिकाची जात
गणेश ब्रोकोली, पालम समृद्धी, पुसा केटीएस-१

लागवड
गादी वाफ्यावर बी पेरून रोपे तयार करून लागवड करतात. गादी वाफे एक मी. रुंद, २० सें.मी. उंच, १० मी. लांब आकाराचे तयार करण्यासाठी प्रथम जमीन नांगरून, कुळवून भुसभुशीत करून घ्यावी. प्रत्येक गादी वाफ्यात अंदाजे १० ते १५ किलो चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळून घ्यावे. शिफारस केलेले कीटकनाशक ही मातीत मिसळावे. वाफ्याच्या रुंदीच्या समांतर पाच सें.मी. अंतरावर दोन सें.मी. खोलीच्या रेषा आखून त्यामध्ये अतिशय पातळ प्रमाणात बियांची पेरणी करावी. बारीक गाळलेल्या शेणखताने बी झाकून घ्यावे. बी पेरलेल्या गादी वाफ्यांवर पाणी दिल्यानंतर प्लॅस्टिक पेपरने झाकून घ्यावे. बियांची उगवण सुरू झालेली दिसताच वाफ्यांवरून प्लॅस्टिक पेपर काढून टाकावा. बी सहा ते सात दिवसांत उगविलेल्या दिसतात. एकरी लागवडीसाठी संकरित जातीचे बियाणे १२५ ग्रॅम लागते. उच्च प्रतीचे गड्डे, जास्त उत्पादन, गड्ड्यांचा आकार एकसमान मिळण्यासाठी रोपांची पुनर्लागवड गादी वाफ्यावर ३० बाय ३० सें.मी.अंतरावर करावी.एकरी सुमारे २६,६६० इतकी रोपे बसतात. लागवड दुपार नंतर करावी. त्यानंतर रोपांना ठिबकद्वारे पाणी द्यावे. लागवडीपूर्वी रोपे शिफारस केलेल्या कीटकनाशकाच्या द्रावणात बुडवून घ्यावीत. हरितगृहांमध्ये लागवड प्रत्येक गादीवाफ्यावर ३० बाय ३० सें.मी. अंतरावर करावी.

खत व्यवस्थापन
सर्वप्रथम माती परीक्षण करून जमिनीतील उपलब्ध मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांची माहिती घ्यावी. त्यानुसार खत व्यवस्थापन करावे. एकरी ६० किलो नत्र,४० किलो स्फुरद आणि ७० किलो पालाश देणे आवश्‍यक आहे. खतांचे पीकवाढी नुसारचे टप्पे शिफारशीनुसार द्यावेत. मुख्य गड्ड्यांची काढणी झाल्यावर पानांच्या बेचक्‍यांतून येणाऱ्या गड्ड्यांची वाढ होण्यासाठी एकरी ३० किलो नत्र द्यावे. बोरॉनची कमतरता असल्यास खोड पोकळ होणे आणि गड्ड्यांचा हिरवा रंग फिकट होणे ही लक्षणे आढळून येतात. उपाय म्हणून लागवडीनंतर २५-३० दिवसांनी एकरी चार किलो बोरेक्‍स (सोडियम टेट्रा बोरेट) जमिनीतून द्यावे. लागवडीनंतर ६० दिवसांनी पुन्हा चार किलो बोरेक्‍स जमिनीतून द्यावे. ब्रोक्रोली पानांच्या झाडांचा शेंडा खुरटलेला राहणे व गड्डा न भरणे ही मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे. विशेषतःआम्लीय जमिनीत (सामू ५.५ च्या खाली) ही विकृती दिसून येते. उपायासाठी एकरी १.६ कि.ग्राम अमोनियम किंवा सोडियम मॉलीब्डेट्‌ जमिनीत मिसळून द्यावे.

पाणी व्यवस्थापन
पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे.

रोग नियंत्रण
किडी :- मावा, तुड्तुडे, काळी माशी, चौकोनी ठिपक्याचा पतंग अशा विविध किडींचा प्रादुर्भाव होतो. उपाय- मॅलेथिऑन १ मिली. किंवा डायमिथोएट १ मि.ली.प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. रोग :- रोप कोलमडणे, घाण्या रोग, करपा, भुरी, केवडा, क्लब रूट आणि ब्लक लेग अशा रोगांचा ब्रोकोली पिकांवर प्रादुर्भाव होतो. उपाय :- या रोगांच्या नियंत्रणासाठी काँपर ऑक्सिक्लोराईड २.५o गॅम किंवा डायथेन एम.४५ २.५० ग्रॅम किंवा बाविस्टीम १ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून ३ ते ४ फवारण्या १o ते १२ दिवसांच्या अंतराने कराव्यात तसेच रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी.

उत्पादन
वाणपरत्वे ब्रोकोलीचा गड्डा ६० ते ७० दिवसांत लागवडीपासून काढणीस तयार होतो. विक्रीच्या दृष्टीने व चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने गड्ड्यांचा व्यास ८ ते १५ सें.मी. असतानाच काढणी करावी. गड्डा घट्ट असताना त्यातील कळ्यांचे फुलात रूपांतर होण्यापूर्वीच काढणी करणे महत्त्वाचे. अशा गड्ड्यांची प्रत अतिशय चांगली असून,या अवस्थेत गड्ड्यातील फुले उमलत नाहीत. काढणी सकाळी अथवा सायंकाळी करावी. तयार गड्डे साधारणपणे १५ सें.मी.लांबीचा दांडा ठेवून कापून घ्यावेत. मुख्य गड्डा काढून घेतल्यानंतर खाली पानांच्या बेचक्‍यांतून येणारे गड्डे पोसण्यास वाव मिळतो.प्रत्येक गड्ड्याचे वजन सरासरी ३०० ते ४०० ग्रॅम असणे आवश्‍यक आहे. एकरी ४० गुंठे क्षेत्रातून सुमारे ८ ते ९ टनांपर्यंत गड्ड्यांचे उत्पादन मिळते.