krushikranti.com
29-09-18मळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ्या यंत्राची गती आणि जाळी हलवण्याचे अंतर या गोष्टींवर अवलंबून असते. निर्मात्याच्या शिफारशीनुसार यंत्राची गती निश्‍चित करावी. ही गती कमी-जास्त करण्यासाठी फॅन पुली किंवा ड्राइव्ह पुली कमी-जास्त व्यासाची वापरावी.

मळणी यंत्राच्या ड्रमची गती वाढविल्यास लागणारी ऊर्जा व दाणे तुटण्याचे प्रमाण कमी होते. परंतु, एकूण धान्याचा अपव्यय वाढतो. यात स्वच्छ धान्य, मळणी झालेले धान्य आणि मळणी न करता वाया गेलेल्या धान्याचा समावेश होतो.

ड्रमची गती कमी केल्यास मळणी यंत्राची क्षमता, धान्य स्वच्छ करण्याची क्षमता कमी होते, धान्य वाया जाण्याचे प्रमाण वाढते. ‘ब्यूरो ऑफ इंडिया स्टॅंडर्ड`ने प्रमाणीत केल्यानुसार मळणी यंत्राद्वारे होणारे एकूण धान्य तोटा हा पाच टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नसावा, तसेच दाणे फुटण्याचे प्रमाण दोन टक्‍क्‍यांपेक्षा कमी असावे.

पीक आणि मळणासाठी ड्रमची गती

पिकाचे नाव : ड्रमची गती (मि/ सेकंद) 
सोयाबीन :8-10
बाजरी :15-20
ज्वारी : 15-20
मका : 9-12
गहू : 20-25
भात :15-20
मळणी ड्रम व जाळीतील फट :

फिरणारा सिलेंडर व ड्रम यांमधील अंतर सामान्यतः १२ ते ३० मिमी इतके असावे. हे अंतर कमी असल्यास धान्याबरोबर त्याची काडी मळली जाते, त्यामुळे अधिक प्रमाणात ऊर्जा लागते.
 ब्लोअर/ पंखा/ ऍस्पिरेटर ऍडजस्टमेंट :

निर्मात्याच्या शिफारशीनुसार यंत्राची गती निश्‍चित करावी. ही गती कमी-जास्त करण्यासाठी फॅन पुली किंवा ड्राइव्ह पुली कमी-जास्त व्यासाची वापरावी. फॅनची गती जास्त झाल्यास भुश्‍याबरोबर धान्यही फेकले जाऊ शकते किंवा कमी झाल्यास धान्यात भुसा मिसळला जातो.
 चाळणीची ठेवण
मळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ्या यंत्राची गती आणि जाळी हलवण्याचे अंतर या गोष्टींवर अवलंबून असते.

सामान्यतः चाळणीचा उतार २ ते ६ अंश असावा. चाळणी हलविणाऱ्या यंत्राचा वेग ३०० ते ४०० फेरे/ मिनिट असावा. चाळणी हलवण्याचे अंतर १५ ते २५ सें.मी. दरम्यान असावे.
अडचणी व त्यावरील उपाययोजना
दाणे व्यवस्थित वेगळे न होणे.

1) सिलेंडरची गती वाढवावी.
2) दाणे ओले असतील तर मळणीयंत्रात टाकू नयेत.
3) मळणीयंत्र व ड्रममधील अंतर कमी ठेवावे.
दाणे तुटण्याचे प्रमाण वाढणे

1) जास्त प्रमाणात फिडिंग करू नये.
2) ओले पीक असेल तर मळणीयंत्रात टाकू नये.
धान्य/ दाणे भुश्याबरोबर उडणे.

1) पंख्याची गती कमी करावी.
धान्य/ दाणे यात भुसा येणे.

1) पंख्याची गती वाढवावी.
2) चाळणी हलणाऱ्या यंत्राची गती वाढवावी.
3) समप्रमाणात पीक टाकावे.
4) पिकानुसार विशिष्ट आकाराच्या चाळण्या वापराव्यात.
वरच्या चाळणीवर दाण्याचे प्रमाण वाढणे

1) चाळणीचे छिद्र बंद झाले असल्यास ते स्वच्छ करावे. चाळणीचा उतार कमी करावा.
2) पिकानुसार विशिष्ट आकाराच्या चाळण्या वापराव्यात.
मळणी ड्रम जाम होणे

1) जास्त प्रमाणातील फिडिंग टाळावे.
2) सर्व बेल्टचा ताण तपासावा.
3) सिलेंडरची गती वाढवावी.
4) वाळलेल्या पिकाचीच मळणी करावी.
5) मळणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पिकात गवत असेल तर ते काढून घ्यावे.
6) सिलेंडर आणि ड्रमचे अंतर व्यवस्थित करावे.
 मळणी यंत्र वापरताना घ्यावयाची काळजी :
 सुरक्षित मळणी करण्यासाठी आयएसआय मार्क असलेले मळणी यंत्र वापरावे.

 मळणी करण्यापूर्वी पीक पूर्णपणे वाळलेले असावे.

 पीक मळणीची जागा राहत्या घरापासून दूर व समतोल असावी.

 रात्री मळणी करताना योग्य प्रमाणात उजेड असेल तरच मळणी करावी

 मळणी यंत्राची दिशा अशा प्रकारे ठेवावी, की बाहेर पडणारा भुसा व वाऱ्याची दिशा एकच राहील.

 सर्व नटबोल्ट व्यवस्थित घट्ट बसवावे.

 यंत्रामध्ये पिकाची टाकणी एकसारखी व एक प्रमाणात असावी.

 यंत्राच्या जाळ्यांची वरचेवर पाहणी करावी, त्या स्वच्छ कराव्यात.

 सरासरी ८ ते १० तासानंतर मळणी यंत्रास थोडी विश्रांती द्यावी.

 मळणी सुरू करण्यापूर्वी यंत्र मोकळे चालवून यंत्राचा कोणता भाग घासत नसल्याची खात्री करून घ्यावी, असल्यास निर्मात्याने दिलेल्या शिफारशीनुसार बदल करावे.

 मळणी करताना सैल कपडे घालू नये.

 मळणी यंत्रात पीक टाकताना चालकाने हात सुरक्षित अंतरावर ठेवावे.

 सामान्यतः ‘बीआयएस`ने प्रमाणित केलेले सुरक्षित फीडिंग वापरावे.

 यंत्रातील बेअरिंगला वंगण लावावे. बेल्टचा ताण तपासावा.

Ref:-agrowone