हिरवळीची पिके आहेत जमिनीसाठी उत्तम खत, पहा कसे

19-01-2023

हिरवळीची पिके आहेत जमिनीसाठी उत्तम खत, पहा कसे

हिरवळीची पिके आहेत जमिनीसाठी उत्तम खत, पहा कसे 

हिरवळीचे खते जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा करतात. जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारतात. जमिनीची जलधारणाशक्ती वाढते. याचा पीक उत्पादनवाढीसाठी फायदा होतो.

ताग, धैंचा, उडीद, मूग, चवळी, गवार, इत्यादी द्विदल पिके शेतात वाढवून फुलोऱ्यावर येण्यापूर्वी नांगरून जमिनीत गाडावीत. याचबरोबरीने गिरीपुष्प, सुबाभूळ, करंज या पिकाच्या कोवळ्या फांद्या व हिरवी पाने जमिनीत गाडून कुजवावीत.

ताग ः 

  1. हे पीक शेंगवर्गीय (द्विदल) वर्गातील असल्यामुळे याच्या मुळावर नत्र शोषण करणाऱ्या जिवाणूंच्या गाठी असतात. 
  2. झाडाला चमकदार, लुसलुसीत, गर्द हिरव्या रंगाचे लांबोळकी आकाराची भरपूर पाने असतात. फुले पिवळ्या रंगाची असतात. 
  3. पीक जमिनीत गाडल्यानंतर कुजून हेक्‍टरी 50 ते 60 किलो नत्राचे स्थिरीकरण होते. सेंद्रिय पदार्थात 0.8 टक्के नत्र, 1 टक्के स्फुरद व 0.5 टक्के पालाश असते.

लागवड तंत्र ः 

  1. हे पीक निचरा होणाऱ्या हलक्‍या ते भारी सर्वप्रकारच्या जमिनीत घेता येते. आम्ल व पाणथळ जमिनीत बीजोत्पादन घेऊ नये. पेरणी चांगला पाऊस पडल्यावर ताबडतोब करावी. 
  2. लागवडीसाठी के-12, डी-11, एम-19, एम-35, नालंदा या जातींची निवड करावी. पेरणी सरत्याने किंवा तिफणीने, दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवून करावी. पेरणीसाठी हेक्‍टरी 25 ते 40 किलो बियाणे वापरावे. फेकीव पद्धतीकरिता हेक्‍टरी 55 ते 60 किलो बियाणे लागते. 
  3. पेरणीपूर्वी 15 किलो बियाणास 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. सेंद्रिय शेती पद्धतीत कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत वापरू नये. 
  4. आंतर मशागत करण्याची आवश्‍यकता नाही. पेरणीपासून 40 ते 50 दिवसांनी पीक फुलावर येण्यास सुरवात झाल्यानंतर नांगराच्या सहायाने जमिनीत गाडावे. त्यामुळे जमिनीत 80 ते 120 किलो नत्र प्रति हेक्‍टरी साठविले जाते.

धैंचा ः 

  1. हे द्विदल वर्गीय पीक आहे. याच्या मुळावर, खोडावर व फांद्यांवर जिवाणूंच्या गाठी असतात. त्या हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात. हे पीक तागाच्या तुलनेत विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते. 
  2. याची लागवड भात शेती किंवा उसात आंतर पीक म्हणून केली जाते. हे पीक पाणथळ, क्षारयुक्त, चोपण तसेच आम्लयुक्त हलक्‍या अथवा भारी अशा विविधप्रकारच्या जमिनीत घेता येते. 

लागवड तंत्र ः 

  1. खोल नांगरणी करून वखराच्या उभ्या-आडव्या पाळ्या देऊन जमीन भुसभुसीत करावी. चांगला पाऊस पडल्यावर पेरणी करावी. लागवडीसाठी स्थानिक जात किंवा टीएसआर-1 या जातीची निवड करावी. 
  2. सरत्याने पेरणी करताना त्यात माती किंवा बारीक रेती मिसळावी. दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. हेक्‍टरी 25 ते 30 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी 15 किलो बियाणास 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. 
  3. सेंद्रिय पद्धतीमध्ये रासायनिक खतांचा वापर व आंतर मशागत करू नये. 
  4. पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांत पिकाची 100 ते 125 सें. मी. उंच वाढ होते. या अवस्थेत ट्रॅक्‍टरचलित नांगराच्या सहायाने जमिनीत गाडावे. त्यामुळे जमिनीत 70 ते 100 किलो नत्र प्रति हेक्‍टरी साठविले जाते.

हिरवळीच्या खतांचे फायदे ः 

  1. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण आणि सूक्ष्म जिवांच्या क्रियांची गती वाढते. 
  2. पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते, धूप कमी होते, जलधारणक्षमता वाढते. 
  3. मातीच्या रचनेत सुयोग्य बदल होतात. 
  4. शेंगवर्गीय पीक हिरवळीच्या खतासाठी घेतल्याने जास्तीचे नत्र जमिनीत स्थिर होते, त्यामुळे पुढील पिकास नत्राची मात्रा कमी प्रमाणात लागते. 
  5. हिरवळीची खते जमिनीत खालच्या थरात निघून जाणाऱ्या अन्नद्रव्यांना धरून ठेवण्यास मदत करतात. हिरवळीची पिके जमिनीतील खालच्या थरातील अन्नद्रव्ये वरच्या थरात आणतात. 
  6. हिरवळीचे खत नत्रासोबतच स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम व लोहाची उपलब्धता वाढविते.

हिरवळीच्या पिकांची निवड ः 

  1. पीक शेंगवर्गीय (द्विदल) असावे. 
  2. पीक हलक्‍या किंवा मध्यम जमिनीत वाढण्यायोग्य असावे. 
  3. पिकास पाण्याची आवश्‍यकता कमी असावी. 
  4. पिकांची मुळे खोलवर जाणारी असावीत, ज्यामुळे जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्ये शोषली जातात. 
  5. वनस्पतीमध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असावे, जेणेकरून त्यांचे विघटन लवकर होईल.

हिरवळीच्या खतांचे प्रकार ः 

अ) मूलस्थानी वाढविलेले हिरवळीचे पीक जमिनीत गाडणे -

  1. हिरवळीचे सलग पीक घेऊन फुलोऱ्यावर येण्याअगोदर नांगरून जमिनीत गाडावे किंवा मुख्य पिकात हिरवळीचे पीक हे आंतरपीक घेऊन फुले येण्यापूर्वी गाडावे. यासाठी ताग, धैंचा, गवार, चवळी, मूग, उडीद यांसारख्या पिकांची निवड करावी. 
  2. गवार, चवळी, मूग, उडीद हे शेंगा तोडल्यानंतरही शेतात गाडता येते. शेंगा तोडल्यानंतर अवशेषांची कुजण्याची क्रिया थोडी लांबते.

ब) हिरवळीचे पीक शेताबाहेर बांधावर किंवा पडीक जमिनीवर वाढवून त्याच्या कोवळ्या फांद्या शेतात आणून जमिनीत गाडणे -

  1. झाडांच्या कोवळ्या, हिरव्या फांद्या व पाने शेतात पसरून नांगराच्या साह्याने ताबडतोब जमिनीत गाडाव्यात. 
  2. गिरीपुष्प, सुबाभूळ, शेवरी, करंज, इत्यादी झाडांच्या पानाचे विघटन लवकर होत असल्यामुळे त्यांच्यापासून हिरवळीचे उत्तम खत मिळू शकते.

हिरवळीचे पीक जमिनीत गाडण्याची योग्य अवस्था ः 

  1. हिरवळीचे पीक ज्या शेतात वाढविले त्याच शेतात (मूलस्थानी) गाडताना ते पीक फुलोरा अवस्थेत असावे. 
  2. हिरवळीचे पीक जमिनीत गाडण्यास उशीर झाला तर पिकातील कर्बाचे प्रमाण वाढते. नत्राचे प्रमाण कमी होते, त्यामुळे लवकर विघटन होत नाही. 
  3. शेताच्या बांधावर अथवा पडीक जमिनीमध्ये वाढविलेल्या हिरवळीच्या खतांच्या पिकाची पाने व कोवळ्या फांद्या शेतात गाडावयाच्या असल्यास योग्य अवस्था निश्‍चित नाही. परंतु, फांद्या अथवा पाने कोवळी व लुसलुसीत असावीत. 
  4. हिरवळीच्या खतांचे फायदे हे पीक जमिनीत गाडण्याची वेळ व ते कुजण्यासाठी मिळालेला पुरेसा कालावधी यावर अवलंबून असतात. हिरवळीची पिके मुख्य पीक पेरणीच्या पूर्वी जमिनीत गाडावीत. गाडल्यानंतर कुजण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा. 
  5. गाडलेले पीक कुजण्यासाठी पुरेसा ओलावा आणि तापमान असावे. कुजण्यासाठी लागणारा कालावधी हा प्रत्येक पिकासाठी वेगवेगळा असतो. उदा. उसाच्या मुख्य पिकाबरोबर पेरलेले तागाचे पीक 40 ते 50 दिवसांनी उसास माती लावण्याच्या वेळी जमिनीत गाडावे. सर्वसाधारणपणे 6 ते 8 आठवड्यांचा कालावधी हिरवळीच्या पिकांना संपूर्ण कुजण्यासाठी लागतो.

हिरवळीचे पीक जमिनीत गाडण्याची पद्धत ः 

जेव्हा हिरवळीचे पीक मूलस्थानी जमिनीत गाडावयाचे असते तेव्हा जमीन कोरडी असेल तर एक हलके पाणी देऊन वाफसा आल्याबरोबर नांगराच्या सहायाने जमिनीत गाडावे. त्यामुळे कुजण्यासाठी पुरेसा ओलावा व तापमान मिळते. पीक गाडताना नांगरणीची खोली 10 ते 15 सें. मी. ठेवावी.

हिरवळीच्या खताच्या मर्यादा ः 

  1. जिरायती शेतीत कमी पावसामुळे हिरवळीचे खत व्यवस्थित कुजत नाहीत. त्यामुळे मुख्य पिकाच्या उगवणीवर व वाढीवर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.
  2. हिरवळीचे पीक फलधारणेपूर्वी जमिनीत गाडणे आवश्‍यक आहे. उशीर झाल्यास पिकातील कर्ब : नत्र गुणोत्तर वाढते. तसेच तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढते, त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया मंदावते. 
  3. जर मुख्यपिकाच्या जागी हिरवळीचे पीक घेतले तर पिकाचा हंगाम वाया जात असल्यास आंतरपीक घेणे फायदेशीर ठरते. 
  4. कमी पावसाच्या भागात हिरवळीची पिके घेतल्यास मुख्य पिकाला लागणारा जमिनीतील ओलावा कमी होतो. 
  5. हिरवळीच्या पिकांच्या अती प्रमाणात लागवडीमुळे पिकावर रोग, किडी व सूत्र कृमींची वाढ होण्याचा धोका असतो.

डॉ. व्ही. एम. भाले
कृषी विद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

source : vikaspedia

Green zaid crops are good fertilizers for soil, see how

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading