मका लागवड तंत्रज्ञान

31-01-2023

मका लागवड तंत्रज्ञान

मका लागवड तंत्रज्ञान

मका हे महाराष्ट्र राज्याचे महत्वाचे पिक असुन या पिकाखाली सुमारे 7.08 लक्ष हेक्टर क्षेत्र आहे.पिकाची सरासरी हेक्टरी उत्पादकता 1928 किलो प्रती हेक्टर व उत्पादन 13.65 लक्ष टन आहे.

हवामान

  1. मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि शीत (थंड) अशा वेगवेगळ्या हवामानाशी समरस होण्याची क्षमता असणारे पीक आहे.
  2. समुद्र सपाटीपासून ते २७०० मीटर उंचीच्या ठिकाणी देखील मका लागवड करता येते.
  3. परंतू पीक वाढीच्या कोणत्याही काळात धुक्याचे हवामान मक्यास मानवत नाही.
  4. मका उगवणीसाठी १८ डिग्री सेल्सियस तापमान योग्य असून, त्यापेक्षा कमी तापमान असल्यास थंड आणि ओलसर पणामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊन पीकाच्या उगवणीवर प्रतिकुल परिणाम होतो.
  5. मका पिकाची योग्य वाढीसाठी २५ ते ३० डिग्री सेल्सियस तापमान चांगले असते परंतु जेथे सौम्य तापमान (२० ते २५ डिग्री सेल्सियस) आहे अशा ठिकाणी मका वर्षभर घेता येतो.
  6. ३५ डिग्री सेल्सियस पेक्षा अधिक तापमान असल्यास पीक उत्पादनात घट येते. परागीभवनाच्या वेळी अधिक तापमान आणि कमी आद्रता असल्यास त्याचा विपरीत परिणाम परागीभवन व फलधारणेवर होऊन उत्पादनात घट येते.

जमीन

  1. मक्यासाठी मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची, अधिक सेंद्रिय पदार्थ आणि जलधारणा शक्ती असलेली जमीन चांगली.
  2. विशेषतः नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत हे पीक फार चांगले येते.
  3. परंतु अधिक आम्ल ( सामू ४.५ पेक्षा कमी) आणि चोपण अगर क्षारयुक्त (८.५पेक्षा अधिक सामू) जमिनीत मका घेऊ नये.
  4. तसेच दलदलीची जमीन सुद्धा टाळावी.
  5. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान असावा.

पूर्वमशागत

  1. जमिनीची खोल (१५ते२०सें. मी.) नांगरट करावी. पिकाची धसकटे, अवशेष, काडीकचरा इत्यादी खोल नांगरटीमुळे जमिनीत गाडल्याने जमिनीत सेंद्रिय पदार्थ मिळतो व जमिनीचा पोत सुधारतो.
  2. कुळवाच्या २-३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
  3. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी हेक्टरी १० ते १२ टन (२५ ते३० गाडया) चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळावे.
  4. हिरवळीचे खत जमिनीत गाडले असल्यास शेणखताची आवश्यकता भासत नाही.

सुधारित वाण :

  1. सुधारित वाणांचा वापर केल्यास अधिक उत्पादन मिळते.
  2. मक्याच्या संमिश्र व संकरीत जाती या स्थानिक वाणांपेक्षा ६० ते ८० टक्के अधिक उत्पादन देतात.
  3. विविध कालावधीमध्ये पक्व होणाऱ्या मक्याच्या संमिश्र व संकरीत जाती उपलब्ध असून पाऊस आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य वाणाची निवड करावी.

पेरणीची वेळ

  1. मका हे खरिप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात घेतले जाते.
  2. खरिप हंगाम : जून ते जुलै २ रा आठवडा खरिपातील पेरणीस उशीर करू नये, कारण उशीर झाल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रोपांची संख्या योग्य राहत नाही.
  3. रब्बी हंगाम : १५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर
  4. उन्हाळी हंगाम : जानेवारी ते फेब्रुवारी २ रा आठवडा
  5. धान्य पीकासाठी १५-२० किलो बियाणे प्रती हेक्टरी
  6. चारा पीकासाठी 75 किलो बियाणे प्रती हेक्टरी

पेरणीची पद्धत

  1. टोकण पद्धतीने पेरणी करावी.
  2. सरी वरंब्यावर पेरणी करावयाची असल्यास सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला जातीपरत्वे अंतर ठेऊन पेरणी करावी.
  3. उशिरा आणि मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जातींसाठी ७५ सें.मी. अंतरावर मार्करच्या साह्याने ओळी आखून २० ते २५ सें.मी. अंतरावर टोकण करावी.
  4. लवकर तयार होणाऱ्या जातींसाठी दोन ओळींत ६० सें.मी. व दोन रोपांत २० सें.मी. अंतर ठेवून वरीलप्रमाणे टोकण करावी.
  5. रब्बी हंगामात मक्याची पेरणी ६० सें. मी. अंतरावर काढलेल्या सरीच्या बगलेत निम्म्या उंचीवर एका बाजूला २० सें. मी. अंतरावर २ बिया ४-५ सें. मी. खोल टोकण करून करावी.
  6. एक हेक्टर पेरणीसाठी १५-२० किलो बियाणे लागते.
  7. अश्याप्रकारे काढणीच्या वेळी प्रति हेक्टरी ९०,००० रोप संख्या मिळते व परिणामी अधिक उत्पन्न मिळते.

आंतरपीक पद्धती

  1. खरिप हंगामात मक्याच्या दोन ओळीत असलेल्या जागेत लवकर येणारी कडधान्ये उडीद, मुग, चवळी आणि तेलबिया (भुईमुग, सोयाबीन) हि आंतरपिके यशस्वीरित्या घेता येतात.
  2. आंतरपीक पद्धतीत ६ : ३ ओळी या प्रमाणात घेणे फायदेशीर आहे.
  3. मक्यात भुईमुग हे आंतरपीक जोडओळ किंवा सोडओळ पद्धतीने घेता येते.
  4. रब्बी हंगामात मक्यामध्ये करडई, कोथिंबीर आणि मेथी हि आंतरपिके भाजीपाल्यासाठी घेणे फायदेशीर आहे.
  5. मक्याची लवकर येणारा वाण ऊस व हळदीमध्ये मिश्र पीक म्हणून घेता येते परंतु अशा आंतरपीक पद्धतीमुळे मुख्य पिकाच्या उत्पादनात घट येते. त्यासाठी मुख्य पिकास व अंतर पिकास शिफारशीत खतमात्रा देणे गरजेचे आहे.
  6. मका हे मिश्र पीक मुख्यतः हिरवी कणसे आणि चारा यासाठी घेतात.

बीजप्रक्रीया

  1. पेरणीपूर्वी २ ते २.५ ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास चोळावे, म्हणजे करपा रोगाचे नियंत्रण करता येते.
  2. तसेच अझोटोबक्टर जीवाणू संवर्धन २५ ग्रॅम किंवा 100 मिली प्रति किलो बियाण्यास लावून नंतर पेरणी करावी.

खते

  1. तूर पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी 75 किलो नत्र व 75 किलो स्फुरद व 75 किलो पालाश द्यावे.
  2. पेरणीनंतर एक महिन्याने 75 किलो नत्र द्यावे.
  3. जस्ताची कमतरता असल्यास प्रति हेक्टरी २० ते २५ किलोग्रॅम झिंक सल्फेट पेरणीच्यावेळी द्यावे.
     

सिंचन:

  1. मक्याची पाने रुंद व लांब असतात. बाष्पीभवन क्रियेमुळे पानातून अधिक पाणी बाहेर टाकले जात असल्याने या पिकास पाण्याची गरज अधिक आहे.
  2. खरिप हंगामात निश्चित आणि विस्तृतपणे पावसाची विखरण असणाऱ्या भागात मका पिक जिरायती खाली घेता येते
  3. मका पीक पाण्याच्या ताणास खूपच संवेदनशील आहेत. म्हणून खरिप हंगामात पावसात खंड पडून पाण्याचा ताण पडल्यास पिकाच्या महत्वाच्या अवस्थेच्या काळात संरक्षित पाणी द्यावे.

महत्वाच्या अवस्था

मका पिकाच्या महत्वाच्या अवस्थांच्या वेळी पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते म्हणून अशा अवस्थांच्या काळात पाणी द्यावे.

  1. रोप अवस्था (२५-३० दिवसांनी),
  2. पिक वाढीची अवस्था – हा काळ साधारणपणे पीकाचे उगवणीनंतर ३०-४५ दिवसाचा असतो.वाणाच्या गुणधर्मानूसार मक्यास साधारणपणे १५-२० पाने येतात ही क्रिया झाडावरतूरा येईपर्यंत सुरू राहते.
  3. तुरा बाहेर पडताना (४५-५० दिवसांनी) – तूरा वरच्या टोकापासून झुपक्यासारखा येतो. यामधून पुंकेसर बाहेर पडण्याची क्रिया साधारणत: १५ दिवसापर्यंत सुरू राहते.
  4. फुलोऱ्यात असताना (६०-६५ दिवसांनी) – कणसे उमलण्याचा कालावधी:- मक्याचे वरचे टोकापासून तुरा बाहेर पडल्यानंतर २-३ दिवसात झाडाच्या एकूण पानापैकी मधल्या प्रथम पानातुन कणीस बाहेर पडण्यास सुरूवात होते. 
  5. या कणसातून स्त्रीकेसर बाहेर पडतात व या स्त्रीकेसरावर तु-यामधून निघणारे पुंकेसर पडून त्यांचे संयोगीकरण होते व बीजधारणा होते. कणीस निघण्याचा व संयोगीकरणाचा कालावधी साधारणपणे ५० ते ७० दिवस पर्यतचा असतो.
  6. दुधाळ अवस्था :- हा काळ साधारणतः ४ ते ५ आठवड्याचा असतो.
  7. दाणे भरणेचेवेळी (७५-८० दिवसांनी). दाणे पक्व होण्याचा काळ :- दुधाळ अवस्थेनंतर दाणे पक्क होण्याकरीता १५ ते २० दिवसलागतात
  8. रब्बी हंगामात जमिनीच्या मगदुरानुसार १०-१२ दिवसाच्या अंतराने, तर उन्हाळी हंगामात ८-१० दिवसाच्या अंतराने पाणी दयावे.

काढणी, मळणी व साठवणूक

  1. धान्यासाठी मका पिकाची काढणी कणसावरील आवरण पिवळसर पांढरे आणि दाणे टणक झाल्यावर करावी.
  2. त्यासाठी ताटे न कापता प्रथम कणसे सोलून खुडून घ्यावीत आणि सोललेली कणसे दोन तीन दिवस उन्हात चांगली वाळवावीत.
  3. त्यानंतर कणसातील दाणे काढण्यासाठी मका सोलणी यंत्राचा वापर करावा.
  4. सोलणी यंत्राने दाणे काढल्यानंतर मका दाण्यात ओलाव्याचे प्रमाण १०-१२ टक्के इतके होईपर्यंत उन्हात चांगले वाळवावे म्हणजे साठवणुकीत किडीमुळे नुकसान होत नाही.
  5. मका काढणी पीक पूर्ण पक्व होण्यापूर्वी म्हणजे दाण्यात २५-३० टक्के पर्यंत ओलाव्याचे प्रमाण( फिजिओलोजिकल मच्यूरिटी) असताना करता येते.
  6. अशी काढणीची अवस्था पीक पूर्ण पक्व होण्याच्या १०-१५ दिवस अगोदर येते.
  7. अशी काढणी केल्यामुळे उत्पन्नात घट येत नाही मात्र कणसे चांगली वाळवावी लागतात. तसेच अश्या प्रकारच्या काढणीमुळे हिरवी ताटे जनावरांना खाण्यास वापरता येतात.

उत्पादन
सर्वसाधारणपणे संमिश्रवाणांपासून हेक्टरी ५० क्विटल व संकरीत वाणांपासून हेक्टरी ९५- ते १०० क्विटल उत्पादन मिळते.

महत्वाचे 

तुम्हाला मका लागवड करायची आहे, आणि बियाण्याची गरज आहे. तर तुम्ही krushikranti.com या आपल्या हक्काच्या वेबसाईट वर जाऊन खरेदी करू शकता.

जर तुमच्याकडे मकाचे पीक आहे आणि या आपल्याला ते विकायचं आहे, तर चिंता करण्याचं काहीच कारण नाही. आपण कृषी क्रांती या आपल्या वेबसाईट वर जाऊन खरेदी दारांशी संपर्क करू शकता किंवा आपण जाहिरात करा वर जाऊन आपल्या मालाची जाहिरात करू शकता, लगेच आपल्याला खरेदी दारांचे कॉल यायला सुरुवात होईल.

कृषी क्रांती वरती जाहिरात करणे खूप सोपे आहे, कृषी क्रांती वेबसाईट वर जायचे, जाहिरात करा वर जायचे, आपल्या मालाबद्दल माहिती भरायची आणि जमा करा बटनावर क्लिक करायचं, झाली तुमच्या मालाची जाहिरात. 

source : vikaspedia

Maka, Maize Cultivation Technology, All season crop,maka bajar bhav

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading