संत्रा लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान

08-02-2023

संत्रा लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान

संत्रा लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान

विशिष्ट अशी आंबट गोड चवीबरोबर प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या क्षमतेमुळे संत्र्याची मागणी वाढत आहे. नवीन लागवडीसाठी पूर्वतयारी करण्यासाठी सध्या योग्य वेळ आहे. लागवडीसाठी मशागत व खड्डे घेण्यापूर्वी लागवडीची आधुनिक पद्धती जाणून घ्यावी.

लिंबूवर्गीय फळांमध्ये भारतात संत्र्याचे ४१ टक्के, मोसंबीचे २३ टक्के आणि कागदी लिंबूचे २३ टक्के क्षेत्र लागवडीखाली आहे. विदर्भातील काही जुन्या बागा आजही हेक्टरी २० ते २५ टन उत्पादन देत आहेत. 

जमिनीची निवड 

फळबागांची लागवड दीर्घकाळासाठी असल्यामुळे त्यासाठी योग्य जमिनीची निवड करणे गरजेचे असते. योग्य जमिनीची निवडीमुळे झाडांचे आयुष्य, नियमित फलधारणा, साल विरहित झाडे किंवा इतर रोगांचा नगण्य प्रादुर्भाव इ. बाबी साध्य होतात. केवळ अयोग्य जमिनीच्या निवडीमुळे पुढे बागायतदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

  • जमिनीचा प्रकार - हलकी, मुरमाड, मध्यम ते काळी करड्या रंगाची जमीन असावी. १ ते १.५ मीटर खोल आणि त्याखाली कच्चा मुरूम
  • जमिनीचा सामू (pH) – ६.५ ते ७.५,
  • मुक्त चुनखडीचे प्रमाण – १० % पेक्षा कमी
  • जमिनींची क्षारता – ०.५ डेसिमल पर्यंत
  • मिनीची खोली – जमिनीची खोली कमीत कमी १ मीटर असावी. मात्र, १ मीटर पेक्षा कमी खोली असलेल्या जमिनीमध्येसुद्धा योग्य प्रकारे खते व मशागतीचा अवलंब केल्यास उत्तम उत्पादन घेत येऊ शकते.
  • पाण्याचा उत्कृष्ट निचरा होणारी जमीन असावी. बहर धरताना योग्य काळ पाण्याचा ताण बसणे जरूरीचे असते. असा ताण भारी जमिनीत बसत नसल्याने फलधारणा, फळांचे उत्पादन व दर्जा यावर विपरीत परिणाम होतो.
  • जमिनीची खोली – जमिनीची खोली कमीत कमी १ मीटर असावी. मात्र, १ मीटर पेक्षा कमी खोली असलेल्या जमिनीमध्येसुद्धा योग्य प्रकारे खते व मशागतीचा अवलंब केल्यास उत्तम उत्पादन घेत येऊ शकते.
  • ६० टक्क्यांपेक्षा कमी चिकण माती असणारी जमीन योग्य समजण्यात येते.
  • अयोग्य जमिनी – ढोबळ मानाने चोपण, खारवट व चिबड जमिनी किवा कमी निचऱ्याच्या भारी जमीन निवडू नये.

महत्त्वाच्या बाबी –

लागवडीकरिता निवडलेल्या शेताला चारीही बाजूने किमान १ मीटर खोलीचे चर केल्यास पाण्याच्या निचऱ्याच्या समस्येवर मात करता येते. सुधारित जाती नागपुरी संत्रा विदर्भाच्या हवामानात सर्वात चांगला व अधिक उत्पादन देणारे वाण आहे. पीडीकेव्ही संत्रा ५ नागपूर संत्र्यापासून निवड पद्धतीने विकसित, अधिक उत्पादनक्षम, आकर्षक रंग, रसदार फळे व आंबट गोड चवीचे योग्य गुणोत्तर देणारे वाण आहे. नागपूर सीडलेस हे बिन बियाचे किंवा एकदम कमी बिया असणारे वाण आहे. 

कलमांची निवड बरेचदा शेतकरी स्वस्त आणि ३ ते ५ फूट उंचीची हिरवीगार, लुसलुशीत अशी कलम निवडतात. मात्र, अशा कलम या पानसोटाच्या डोळ्यापासून केलेल्या असू शकतात. अशा झाडांना फळे कमी लागतात. कलमावर डोळ्याची उंची कमी असल्यास विविध रोगांच्या समस्या येतात. पर्यायी झाडांचे आयुष्य कमी होऊन अपेक्षित उत्पादन मिळत नाही. या करिता कलम निवड करतांना खालील बाबी लक्षात घ्याव्यात.

कलमांची निवड कशी  करावी

  • कलमे शासकीय किंवा नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच घ्यावी.
  • कलमे जंबेरी किंवा रंगपूर खुंटावर २० ते ३० से.मी. उंचीवर डोळा बांधलेली असावी.
  • कलमाची जाडी पेन्सिलच्या आकाराची व उंची २.५ ते ३ फूट असावी.
  • कलमेच्या सालीवर पांढऱ्या रेषा असलेली परिपक्व, भरपूर तंतुमय मुळे असलेली असावी.
  • कलमीकरण ८-९ महिन्यापूर्वी केलेले असावे. कलम सशक्त, रोगमुक्त व जातिवंत संत्र्याच्या मातृवृक्षापासून तयार केलेली असावी.
  • शक्यतो पिशवीतील रोपांना प्राधान्य द्यावे.

लागवड पारंपारिक पद्धतीने ६ x ६ मीटर अंतरावर व नवीन शिफारशीत घन लागवड पद्धतीने (इंडो-इस्राइल तंत्रज्ञान) करावी.

पारंपारिक पद्धत

  • लागवड ही ६ x ६ मी. अंतरावर करावी.
  • या मध्ये उन्हाळ्यात ७५x७५x७५ सेंमी. आकाराचे खड्डे खोदून उन्हात तापू द्यावे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी १ भाग चांगले कुजलेले शेणखत, २ भाग गाळाची माती, २ किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण करून जमिनीच्या अर्धा फूट वरपर्यंत भरावे. 
  • पावसाळ्यात कलमांची लागवड करावी.
  • डोळा बांधलेला भाग हा जमिनीच्या किमान ६ इंच वर असावा. जेणेकरून मातीचा आणि पाण्याचा थेट संपर्क होणार नाही.
  • शक्यतो लागवड करण्यापूर्वी ठिबक संच बसवून घ्यावा.
  • पाण्याचा योग्य निचरा होण्याकरिता बागेभोवती जमिनीचा उतारानुसार १ मीटर रुंद व १ मीटर खोल चर किंवा नाल्या करून घ्याव्यात.

घन पद्धतीने लागवड 

  • या पद्धतीत दोन झाडातील अंतर कमी करून प्रती हेक्टरी झाडांची संख्या वाढविली जाते.
  • लागवड ६ x ३ मीटर अंतरावर शिफारशीत आहे.
  • लागवड गादी वाफ्यावर करावी. त्याकरिता ३ मीटर रुंद व १ ते १.५ मीटर उंच गादी वाफा उत्तर- दक्षिण दिशेने तयार करावे.
  • दोन ओळीतील अंतर ६ मीटर व दोन झाडातील अंतर ३ मीटर ठेवावे.
  • गादी वाफ्यावर दुहेरी नळीचा वापर करून ठिबक सिंचन करावे. तसेच खत व्यवस्थापन हे सुद्धा ठिबक सिंचनाद्वारे द्यावे.
  • या पद्धतीमध्ये छाटणी तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. योग्य व्यस्थापन केल्यास तिसऱ्या वर्षी बाग बहारावर येऊ शकते.
  • या पद्धतीमध्ये झाडांची संख्या प्रती हेक्टर दुप्पट होते. झाडांना नियमित वाफसा मिळत असल्यामुळे व ठिबकच्या माध्यमातून योग्य असे अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास लवकर व अधिक उत्पादन मिळणे शक्य होते असे अकोला येथील विद्यापीठामध्ये झालेल्या प्रयोगात दिसून आले आहे.

वळण व छाटणी  

लहान वयाच्या झाडांना एक खोड पद्धतीने वाढवावे. त्यानुसार वळण द्यावे. पानसोट वरच्यावर काढत राहावे. मोठ्या झाडांची साल दरवर्षी फळे तोडल्यानंतर काढावी. कापलेल्या जागेवर बोर्डोमलम लावावा.

संपर्क- डॉ. रविंद्र काळे, 

प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ, सुविदे फाऊंडेशन, कृषी विज्ञान केंद्र, वाशीम

source : agrowon

Modern technology of orange cultivation, santra lagwad tantradnyan

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading