जनावरांचे गोचीडांपासून करा संरक्षण फक्त हे करा
03-02-2023

जनावरांचे गोचीडांपासून करा संरक्षण फक्त हे करा
जगभरामध्ये गोचीडाचा प्रादुर्भाव जवळ-जवळ सर्वच जनावरांमध्ये आढळून येतो. एका सर्व्हेनुसार जगभरातील जवळपास ८० टक्के जनावरामध्ये गोचिडांचा प्रादुर्भाव दिसून येतो. गोचीड हा रक्त शोषणारा कीटक वर्गातील परजीवी आहे.
भारतात सुमारे १६० प्रकारच्या गोचीड जाती आढळून येतात, त्यापैकी बुफिलस, रायपीसेफलस मायक्रोप्लस, अमलीओमा, हिम्याफैशालीस कॉर्निस इत्यादी गोचीड जनावरांतील आजाराच्या दृष्टीने जास्त हानिकारक आहेत.
एक गोचीड सुमारे एक ते दोन मिलिलिटर रक्त पितो, त्याचा कालावधी सुमारे ७ ते १४ दिवस राहू शकतो. मोठ्या जनावराच्या शरीरावर अशा अनेक गोचीड असतात.
त्यामुळे जनावरांना अशक्तपणा येतो. गोचिडांच्या चाव्यामुळे जनावरांच्या शरीरावर जखमा तयार होतात, त्वचा उघडी झाल्यामुळे त्यातून जंतुसंसर्ग होऊ शकतो, त्यामुळे टीक पॅरालिसिस हा आजार होतो.
जनावरांचे रक्तपेशीचे आजार, जसे की बबेसिओसिस, आनाप्लासमोसिस, थायलेरियोसिस व इतर वर्गांतील आजार प्राण्यांना गोचिडामुळे होतात. गोचीडद्वारे या जंतूंचा फैलाव जनावरांमध्ये होतो.
गोठ्यात जनावरांच्या अंगावर असणारे गोचीड त्यांच्या शरीरातील तापाला कारणीभूत ठरतात. म्हणून गोचीड ताप हे एक लक्षण आहे.
गोचीडजन्य आजारामुळे जनावरे अशक्त होऊन दगावतात, त्यांचे दूध व मांस उत्पादन घटते. जुलै ते ऑक्टोबर महिन्यात जनावरांच्या शरीरावर गोचीड खूप जास्त प्रमाणात आढळून येतात.
उष्ण व दमट हवामान व इतर आजारांचा प्रादुर्भाव इत्यादी गोष्टी आजार निर्मितीस मदत करतात.
विदेशी जनावरांची आजारास बळी पडण्याची शक्यता तुलनात्मकदृष्ट्या जास्त असते. सामान्यतः गाय, बैल यांच्या तुलनेत म्हशी प्रतिरोधक असतात.
सततच्या स्थलांतरामुळे जनावराला थकवा जाणवतो. त्यामुळे सुद्धा या आजाराचा प्रादुर्भाव होत असल्याचे आढळून आले आहे.
संकरित वासरामध्ये गोचीडांचे प्रमाण अधिक असते.
गोचीडांचे नियंत्रण कसे कराल?
- गोचीड निर्मुलनासाठी बाजारात अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. परंतु एकाच औषधाचा सातत्याने वापर केल्यास गोचीडांना त्या औषधाची सवय होऊन जाते.
- परिणामी औषधाचा परिणाम कमी झालेला दिसून येतो. असे होऊ नये म्हणून दर दोन ते तीन महिन्यांनी औषधे बदलावी लागतात.
- जैविक पद्धतीने उपचार करताना एक लिटर पाण्यात ४० मिली करंज तेल, ४० मिली नीम तेल आणि ४० ग्रॅम साबण मिसळून द्रावण तयार करावं.
- तयार केलेले द्रावण वासरांच्या अंगावर ३ ते ४ दिवसाच्या अंतराने लावावे.
- रासायनिक औषधांपेक्षा हे जैविक औषध स्वस्त, परिणामकारक आणि जनावरांसाठी हानीकारक नाही. त्यामुळे याचा वापर अगदी सुलभपणे करता येतो.
source : agrowon