खत टंचाईत रशिया करत आहे भारताला मदत

22-11-2022

खत टंचाईत रशिया करत आहे भारताला मदत

खत टंचाईत रशिया करत आहे भारताला मदत

 

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किती वाढल्या होत्या. तसेच टंचाई निर्माण झाली होती. मात्र भारताने या काळात आपल्या पारंपरिक पुरवठादार चीनऐवजी रशियाकडून खत आयात वाढवली. भारत खतांसाठी रशियाकडे वळाल्याचा फायदा इतरही देशांना झाला. तर चालू आर्थिक वर्षात चीनला मागे टाकत रशिया भारताला खत पुरवठ्यात आघाडीवर पोचल्याचे वृत्त राॅयटर्स या वृत्तसंस्थेने दिले.

जागतिक पातळीवर रशिया आणि बेलारुस खत निर्यातीत महत्वाची भुमिका पार पाडतात. मागील आर्थिक वर्षात जगातील एकूण पोटॅश निर्यातीपैकी रशिया आणि बेलारुसचा वाटा तब्बल ४० टक्के होता. तसेच रशियाने २२ टक्के अमोनिया, १४ टक्के युरिया आणि १४ टक्के एमएपी निर्यात केला. यावरून रशियाचे जागतिक खत बाजारातील महत्व लक्षात येते.

फेब्रुवारी महिन्यात रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी उलथापालथ झाली. अमेरिकेसह अनेक देशांनी रशिया आणि बेलारुसवर आर्थिक निर्बंध लादल्यानंतर मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती गगनाला भीडल्या होत्या.

भारताला आपल्या पारंपरिक खत पुरवठादार चीनकडून महाग खते मिळत होती. शिवाय खते वेळेत उपलब्ध होत नव्हती. त्यामुळं भारताने रशियाकडून खत आयात वाढविण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय रशिया सवलतीच्या दरात खते देत होता. त्यामुळे भारताला आर्थिक फायदाही झाला. तसेच वेळेत खते उपलब्ध झाली.

खत व्यापारातील अग्रगण्य संस्थेतील अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, भारताने रशियाकडून खते घेतल्याने दोन्ही देशांना फायदा झाला. भारताला जागतिक बाजारातील दरापेक्षा जवळपास ७० डाॅलर प्रतिटनाने खते स्वस्त मिळाली. तर युरोपियन युनियन देशांकडून कमी झालेली मागणी पूर्ण करण्यासाठी त्याच तोडीचा मोठा ग्राहक मिळाला. जून महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात डीएपीचा दर वाहतुकीसह १ हजार डाॅलर प्रतिटन होता. मात्र भारताला रशियाकडून ९२० ते ९२५ डाॅलर प्रतिटनाने खत मिळाले.

चालू आर्थिक वर्षात पहिल्या सहा महिन्यांमध्ये रशिया चीनला मागे टाकून भारताला खत निर्यात करणारा आघाडीचा पुरवठादार ठरला आहे. मागील आर्थिक वर्षात पहिल्या सहा महिन्यांमध्ये भारताने एकूण १०२.७ लाख टन खत आयात केली होती. मात्र यंदा त्यात २.४ टक्क्यांनी वाढ होऊन १०५ लाख टनांवर पोचली.

या सहा महिन्यांमध्ये चीनकडून होणारी खत आयात १७.८ लाख टनांनी घटली. चीनसह जाॅर्डन, इजिप्त आणि युएईकडून होणारी आयातही कमी झाली. मागील हंगामात भारताच्या एकूण खत आयातीत चीनचा वाटा २४ टक्के होता, तर रशियाचा वाटा ६ टक्के होता. मात्र यंदा पहिल्या सहा महिन्यांमध्ये रशियाचा वाटा २१ टक्क्यांवर पोचलाय. भारताने रशियाकडून २१.५ लाख टन खत आयात केले. तर मागील आर्थिक वर्षात भारताने रशियाकडून १२.६ लाख टन खत आयात केले होते.

भारताने रशियाकडून खत घेतल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी होण्यास मदत झाली. याचा फायदा खतासाठी आयातीवर अवलंबून असणाऱ्या ब्राझील, अर्जेंटीना, मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांनाही झाला. भारताने रशियाकडून खत घेतले नसते तर आंतरराष्ट्रीय बाजारात दर आणखी वाढले असते. तसंच या काळात चीन आणि मोरोक्को या देशांकडे खताचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध होता, असं दिल्ली येथील खत उद्योगाच्या सूत्रांनी सांगितले.

source: agrowon

Fertilizer Rate increases, Fertilizer Shortage , dap fertilizer , bio fertilizer

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading