शेडनेट हाऊस - मार्गदर्शन
28-01-2023

शेडनेट हाऊस - मार्गदर्शन
कृषी उत्पादन व उत्पादकता वाढीसाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामध्ये हरितगृह, शेडनेट हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग, प्लॅस्टिक टनेल, ऍन्टी बर्डनेट यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत संरक्षित शेती या घटकामध्ये हरितगृह उभारणी, शेडनेट हाऊस यासाठी अनुदानाची क्षेत्र मर्यादा 1000 चौरसमीटर वरून 4000 चौरसमीटरपर्यंत वाढविली आहे. या घटकांसाठीच्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे आहेत.
शेडनेट हाऊस उभारणी
शेडनेट हाऊसचा उपयोग प्रामुख्याने हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी, उच्च मूल्यांची भाजीपाला पिके व फुलांच्या उत्पादनासाठी करण्यात येतो. शेडनेट हाऊसमध्ये आपणास तापमान, आर्द्रता व कार्बन-डाय- ऑक्साईडच्या प्रमाणावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येते.
शेडनेट हाऊससाठी जागेची निवड -
- लाभार्थी शेतकऱ्याच्या शेतात उंच सखल जमीन असल्यास निवड केलेल्या जागेचे सपाटीकरण करावे.
- मोठ्या वृक्षाच्या सावलीत किंवा इमारतीच्या सावलीत किंवा इमारतीच्या आडोशाची जागा यासाठी निवडण्यात येऊ नये.
- भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशी जागा निवडावी.
- पाणीपुरवठ्याची सुविधा जवळपास असणे आवश्यक आहे.
- पाण्याचा सामू 6 ते 7.5 च्या दरम्यान असेल व क्षारतेचे प्रमाण कमी असेल अशी जागा शक्यतो निवडावी.
- जमीन पाण्याचा निचरा होणारी नसेल किंवा क्षारयुक्त असेल तर बाहेरून लाल रंगाची पाण्याचा निचरा होणारी वालुकामय माती वाफे तयार करण्यासाठी वापरावी.
- जमीन निचरा होणारी नसेल तर शेडनेट हाऊस भोवती लहान चर काढावा, जेणेकरून पाण्याचा निचरा होईल.
- विद्युत पुरवठ्याची सुविधा गरजेची आहे.
- पाणथळ जागा शेडनेट हाऊससाठी निवडू नये.
शेडनेट हाऊस उभारणीसाठी तांत्रिक निकष -
- खांबासाठी पक्का पाया घेतलेला असावा. खड्ड्याचा आकार 1 x 1 x 2 फूट असावा. त्यात मधोमध जीआयचा फाउंडेशन पाइप बसवून त्यास होल्ड फास्ट बार टाकून 1-2-4 प्रमाणात सिमेंट, वाळू, खडी घेऊन तयार केलेले सिमेंट कॉंक्रिट भरावे.
- शेडनेट हाऊसच्या विविध मॉडेल व आकारमानानुसार प्रामुख्याने गोलाकार (राऊंड टाइप) व सपाट (फ्लॅट टाइप) प्रकार आहेत. तसेच आराखड्याप्रमाणे बाजूची उंची व मध्यभागाची उंची ठेवण्यात यावी.
- शेडनेट हाऊससाठी आवश्यकतेनुसार 35 ते 75 टक्के सावलीची शेडनेट वापरण्यात यावी. शेडनेटचे फिटिंग ऍल्युमिनिअम चॅनेल पट्टीमध्ये स्प्रिंगच्या साहाय्याने केलेले असावे.
- शेडनेट हाऊसमध्ये स्प्रिंकलर किंवा ड्रीप इरिगेशनची सोय केलेली असावी.
शेडनेट हाऊसला सर्व बाजूंनी जमिनीपासून एक मीटर उंचीपर्यंत स्कर्टिंगसाठी 150 जीएसएमच्या जीओ फॅब्रिक फिल्मचा उपयोग करण्यात यावा.
शेडनेट हाऊस उभारणीसाठी लागणाऱ्या साहित्यांचे तांत्रिक निकष -
- सर्व पाइप हे गॅल्व्हनाइज्ड आयर्नचे असावेत.
- या पाइपची जाडी कमीत कमी दोन मि.मी. असावी.
- पाइप वेल्डिंगऐवजी नट-बोल्टने जोडावेत.
- पाइपला वेल्डिंगचे जोड नसावेत.
- सपाट व स्थानिक प्रकारच्या शेडनेटची उंची मध्यभागी कमीत कमी 3.25 मी. असावी.
- गोलाकार प्रकारच्या शेडनेटची उंची मध्यभागी कमीत कमी चार मी. असावी.
source : Vikaspedia