आता शेतकऱ्यांना बोगस बियाणे, खतांविरोधात तक्रारी व्हाट्सअँप वर नोंदवता येणार
25-07-2023

आता शेतकऱ्यांना बोगस बियाणे, खतांविरोधात तक्रारी व्हाट्सअँप वर नोंदवता येणार
कृषिमंत्री यांचा व्हाट्सअँप क्रमांक सुरु करण्याचा निर्णय
राज्यातील अनेक ठिकाणी बोगस बियाणे, खते, कीटकनाशकेच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी व्हाट्सअँप क्रमांक सुरु करण्याचा निर्णय कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.
राज्यात काही भागात माॅन्सूनच्या पावसाने चांगली पाऊस पडला. त्याठिकाणी शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या. पण, बोगस बियाणांमुळे बियाणे उगवण्यास अडचणी येत आहेत. अशा शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि किटकनाशकाच्या संदर्भात व्हॉट्सॲप वर तक्रार करता येणार आहे.
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी व्हाट्स ॲप क्रमांक सुरू करण्याचा निर्देश दिले आहेत.
कृषीमंत्री धनंजय मुंडे मंत्रालयात यांनी बैठक घेतली. या बैठकीला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, सहसचिव गणेश पाटील, संचालक विस्तार व सेवा विकास पाटील तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठ्याबाबत आढावा घेतला.
आढावा घेताना मुंडे म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी कापसाच्या बोगस बियाणांची विक्री होत आहे. यासाठी महाराष्ट्रात असलेला महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा २००९ व नियम २०१० अंतर्गत शेतकरी तक्रारी करतात. हजारो दावे आज उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. कंपन्यांवर कारवाई होत नाही आणि तक्रार करणारा शेतकरी यात भरडला जातो. त्यामुळे हा कायद्यात आमुलाग्र सुधारणा करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना त्वरीत न्याय मिळण्यासाठी कडक कायद्याची गरज असून त्याचे प्रारुप तयार करण्याचे निर्देश कृषीमंत्री मुंडे यांनी दिलेत.
शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि किटकनाशकांसंबंधी तक्रार करण्यासाठी व्हाट्स ॲप क्रमांक सुरु करून तो शेतक-यांपर्यंत पोहचवा. शेतकऱ्यांनी या व्हट्स ॲप क्रमांकावर तक्रार केल्यावर त्यांच्या नावाबाबत गोपनियता ठेवण्यात येईल. तसेच संबंधित जिल्ह्यातील भरारी पथकांना मेसेज जाऊन त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी तपासणी करण्याच्या सूचना मुंडे यांनी यावेळी दिल्या.
कापसाच्या एचटीबीटी या वाणाला केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने परवानगी दिली नाही. तरीही महाराष्ट्रात या बियाण्याची विक्री होत आहे. बियाणे उत्पादनाची परवानगी देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन परवाना प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात यावी. तसेच बियाण्यांच्या तक्रारीबाबत ओरिसाच्या धर्तीवर सर्वसमावेशक ॲप किंवा पोर्टल तयार करण्यात यावे, अशा सूचना मुंडे यांनी केली.
source : agrowon