अझोला पशुखाद्यासाठी एक पर्यायी प्रथिनांचा स्रोत...
16-08-2024

अझोला पशुखाद्यासाठी एक पर्यायी प्रथिनांचा स्रोत...
हिरव्या चाऱ्यासाठी पर्यायी खाद्य म्हणून अझोला या पेशिय प्रथिनयुक्त शेवाळाचा पशुखाद्यात चांगला प्रकारे वापर होतो. अझोला ही एक पाण्यावर वाढणारी नेचे वर्गातील वनस्पती आहे.
अझोला ही हवेतील नत्र स्वतःमध्ये साठवून ठेवते. ही वनस्पती नत्र स्थिर करणाऱ्या हिरव्या-निळ्या शेवाळाच्या साहाय्याने नत्र स्थिर करते. हवेतील नत्र स्थिर करत असताना शेवाळ अझोलाच्या पेशीत राहतात व नत्र स्थिर करण्यासाठी मदत करते.
या वनस्पतीची पाने वरच्या बाजूस हिरवी व खालच्या बाजूस पांढरट असतात. तसेच प्रत्येक पानात सूक्ष्म पोकळी असते. त्यातच शेवाळाच्या आधारे नत्र स्थिर केले जाते. नत्र उपलब्धतेसाठी अझोला शेवाळावरच पूर्णपणे अवलंबून असते.
ज्यावेळी जमिनीवर भरपूर पाणी असते, त्यावेळी अझोलाची वाढ जास्त प्रमाणावर, अत्यंत झपाट्याने व कमी वेळेत होते. अझोला शेवाळामध्ये प्रथिने, खनिजे, अमिनो (आम्ल) हे घटक मुबलक असतात.
त्याचे प्रमाण प्रथिने २५ ते ३५ टक्के, खनिजे १० ते १५ टक्के, अमिनो आम्ल ७ ते १० टक्के या प्रमाणामध्ये असते. संकरित वासराला १.५ किलोग्रॅम प्रतिदिन अझोला द्यावा. तसेच करंडाच्या योग्य वाढीसाठी बालखाद्याच्या २० टक्के ॲझोला पावडर द्यावी.
अझोला ही हरितद्रव्य असलेली वनस्पती असल्यामुळे त्याच्या वाढीसाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. यामध्ये नत्राचे स्थिरीकरण करण्याची क्षमता असल्यामुळे त्याच्या वाढीसाठी नत्राची आवश्यकता नसते. मात्र, थोड्या प्रमाणात स्फूरद आवश्यक असते. पोषक वातावरणात अझोलाची वाढ साधारणतः आठ दिवसांत दुप्पट होते.
असा तयार करा अझोला:
- अझोला तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी जागा सपाट व तणविरहित करून घ्यावी.
- १० सें. मी उंचीच्या विटा अशा रीतीने आडव्या लावाव्यात की, २.२५ बाय १.५ मीटरचा आयत तयार होईल.
- या आयताच्या आतील तळाच्या बाजूला जुना प्लास्टिक पेपर अथवा पोती पसरावीत.
- २.५ मीटर बाय १.८ मीटर मापाचे १५० जी. एस. एम. जोडीचे सिलपोलीन प्लास्टिक अशा रीतीने अंथरावे की, जेणेकरून विटांचे काठ झाकले जातील.
- तयार झालेल्या वाफ्यांमध्ये १५ किलो चाळलेली माती समप्रमाणात मिसळावी.
- कुजलेले शेणखत व सिंगल सुपर फॉस्फेट १५ ते २० लिटर पाण्यात मिसळावे.
सात दिवसांत वाढ:
- कल्चरपासून अझोलाची वाढ सात ते आठ दिवसांत होते.
- ५ किलो ग्रॅम कल्चरसारख्या प्रमाणात सावकाश सोडून त्यावर हलकेसे पाणी वरून शिंपडावे.
- एक ते दीड किलो कल्चरपासून आठ ते १० किलो अझोलाची वाढ होते. या वाफ्यातून दररोज एक ते दीड किलो अझोलाचे उत्पादन मिळते.
- अधिक दुग्ध उत्पादनासाठी अझोला सर्वोत्तम असून घरी निर्मिती करता येते.