बांबू लागवड तंत्रज्ञान

10-05-2023

बांबू लागवड तंत्रज्ञान

बांबू लागवड तंत्रज्ञान 

बांबू हे राज्यातल्या वेगवेगळ्या हवामानात येणारे आणि अनेक वर्षे आपल्या शेतात राहणारे पीक आहे. त्यामुळे लागवड करताना योग्य काळजी घ्यावी. लागवडीपूर्वी किमान दोन ते तीन ठिकाणी केलेली बांबू लागवड पहावी. आपण  बांबू लागवडीखाली किमान ३० वर्षे जमीन गुंतवून ठेवणार आहोत, हे लक्षात घेऊन नियोजन करावे. पूर्ण अभ्यास करून बांबू लागवडीकडे वळावे.

बांबू लागवड करताना आपण लागवड कशासाठी करत आहोत हे निश्चित करावे. व्यापारी पद्धतीने लागवड, वारघडीसाठी, जमिनीची धूप थांबवण्यासाठी किंवा पाणी समृद्धीसाठी बांबू लागवड करता येते. या प्रत्येक गोष्टीसाठी लागवड करण्याच्या जाती व पद्धती वेगळ्या आहेत.

हवामान आणि जमिनीच्या प्रकारानुसार जाती आणि लागवडीची पद्धत बदलते.

व्यापारी लागवड करताना बांबूची विक्री कोठे करणार? हा बांबू कोण घेणार? याचा अभ्यास करावा. अजून बांबू लागवडीसाठी २ ते ३ महिने शिल्लक आहेत. या काळात योग्य विचार करून लागवडीचे नियोजन करावे. थोड्याशा चुकीने आपला पैसे, वेळ आणि मेहनत वाया जाऊ देऊ नका.

थोडी उतारावरील, वरकस किंवा मुरुमाड जमीन लागवडीसाठी सर्वांत चांगली असते. काळी जमीन ही जरी चांगली असली तरी इतर भुसार पिके घेणे शक्य नसेल तरच लागवड करावी.

उतारावरील जमिनीवर लागवड करताना कंटूर सर्वेक्षण करून दर ४ ते ५ मीटरवर समतल चर खणावेत. या चरातील माती उताराच्या बाजूस टाकावी. ज्यामुळे सलग वरंबे तयार होतील. या वरंब्याच्या वरच्या चढाच्या बाजूला खड्डे खणावेत. त्याठिकाणी बांबू लागवड करावी.

जर काळी माती असेल आणि पावसात किंवा पाणी दिल्यावर साठून राहत असेल, पाण्याचा निचरा होत नसेल तर बांबू लावताना दर ५ मीटरवर तीन फुटी सरी काढावी. त्यातील माती माथ्यावर सर्वत्र पसरावी. या सऱ्यातून जास्तीचे पाणी वाहून जाईल, ते  शेतात थांबणार नाही. बांबूला साठलेले पाणी चालत नाही. पाण्याचा निचरा झाला पाहिजे.जर आपल्याला मिश्र पीक घ्यायचे असेल तर लागवडीचे अंतर बदलते.

लागवड पद्धत आणि रोपांचे अंतर

लागवडीचा उद्देश, जमीन व जमिनीचा उतार, पाणी देण्याची पद्धत आणि कोणत्या जातीची लागवड करणार यावर रोपे कशी लावायची हे ठरते.

प्रजातीनुसार लागवडीचे अंतर बदलते. आपण निवडलेल्या जातीचा विस्तार कसा होतो हे पाहून अंतर ठरवावे. 

अ) माणगा (सह्याद्री पट्यात लागवड),मानवेल, टूलडा  ः ३ मी x ३ मी. 

ब) हुडा  ः  २ मी x २ मी. 

क) काटेरी बांबू आणि ब्रान्डीसी :  ४ मी x ४मी.


सर्व साधारणपणे पहिली दोन वर्षे नेहमीची पिके बांबू लागवडीत मिश्रपीक म्हणून घेता येतात. नंतर बांबूची सावली वाढते, त्यामुळे मिश्र पिकांचे उत्पादन मिळत नाही.

नेहमी दुष्काळी स्थिती असलेल्या प्रदेशात बांबूमध्ये मिश्र पीक घ्यावयाचे असल्यास  दोन ओळीतील अंतर ५ मीटर  आणि दोन रोपांतील अंतर दोन मीटर ठेवावे. त्यामुळे ज्या वर्षी पाऊस काळ चांगला असतो तेव्हा मिश्रपीक घेणे सोपे जाते.

वारा आणि वर्दळीपासून फळबागेच्या संरक्षणासाठी काटेरी बांबूची लागवड करावी.

नदीकाठ, ओढाकाठ, बांधावर एक किंवा दोन ओळी लावायच्या असतात, तेथे हे अंतर अर्धा मीटरने कमी करावे.

शेत जमीन, डोंगर उतार आणि पाणलोटक्षेत्र किंवा नदी, ओढ्याच्या काठी बांबू लागवड करताना दर दोन रोपांमध्ये एक देशी वृक्ष लावावा. यामुळे बांबू सरळ वाढतो. जेवढा बांबू सरळ, तेवढी त्याची किंमत जास्त. देशी वृक्ष लावल्याने आपापल्या क्षेत्रात जैव विविधता वाढते. देशी वृक्ष आपल्या बांबू रोपांपेक्षा संख्येने निम्मे असावेत.

बांबूची मुळे ३ ते ४ फुटांपर्यंत वाढतात. याला सोटमूळ नाही, फक्त तंतुमय मुळे आहेत. त्यामुळे खड्डा खणताना तो २ फूट x २  फूट x २  फूट  किंवा ३  फूट x ३  फूट x २  फूट खणावा. हे खड्डे आपली रोपे कशी आहेत यावरही अवलंबून असतात.

ठोंबांपासून लागवड करायची असेल तर खड्याची खोली ३ फूट घ्यावी लागेल. बियांपासून किंवा फांदीपासूनच्या रोपांसाठी खड्याची खोली १.५ ते २ फुटांपर्यंत पुरेशी असते.

उन्हाळ्यात खड्डे खणावेत. खड्डे उन्हामध्ये तापू द्यावेत. खड्डे भरताना त्यामध्ये हिरवे गवत सहा इंचापर्यंत भरावे. त्यावर एक पाटी शेणखत, एक किलो निंबोळी पेंड आणि उकरलेल्या मातीच्या मिश्रणाने खड्डा भरून घ्यावा. हिरव्या गवतापासून तयार झालेले खत बांबू रोपाच्या सुरवातीच्या काळात अन्नद्रव्ये पुरवते.

हवामान ढगाळ होताच रोपांची लागवड करावी. रोपाचा जेवढा भाग पिशवीत होता त्यापेक्षा २ ते ३ इंच जास्त जमिनीखाली जाणे आवश्यक आहे. मुळे उघडी राहता कामा नयेत. रोप लावल्याबरोबर भरपूर पाणी द्यावे.

बांबूची व्यापारी लागवड करताना पाण्याची सोय करणे उपयुक्त ठरते. जेवढे नियमित पाणी तेवढी बांबूची वाढ चांगली होते. पहिले दीड वर्ष पाणी दिले तर मर होण्याचे प्रमाण फार कमी होते.

रोप घेताना ते पूर्ण वाढलेले एक ते दीड वर्षे वयाचे आणि २ ते ३ फुटवे फुटलेले असावे.तरच रोपे जगण्याची खात्री असते.

योग्य वयाची रोपे खात्रीशीर रोपवाटिकेतून घ्यावीत. बी स्वतः पेरून  रोपे तयार करून लागवड करणे थोडे अवघड रहाते, कारण खात्रीशीर व चांगल्या उगवण क्षमतेचे बी मिळणे अवघड असते. बांबू बियाण्याची उगवण क्षमता ही फार कमी असते. आपली दीड, दोन वर्षे रोपे तयार करण्यात वाया जा. 

 

bambu lagvad

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading