यशोगाथा : कल्पकता, श्रम आणि नियोजनाचा सुरेख समन्वय
09-04-2024

यशोगाथा : कल्पकता, श्रम आणि नियोजनाचा सुरेख समन्वय
नाशिकला लागूनच असलेले दरी गाव. गावात शेती आणि शेतमजूरी हेच उत्पन्नाचं प्रमुख साधन. गावात शेतीची चर्चा सुरू होताच अशोक पिंगळे यांच्या शेतीची चर्चा सुरू होते. उत्तम नियोजनाने त्यांनी दोन हेक्टर क्षेत्रात लाखोंचे उत्पन्न घेऊन शेती फायद्याची होऊ शकते हे दाखवून दिले आहे.
पिंगळे यांचे हे सर्व यश सहा वर्षांतले. त्यांनी 2 हेक्टर पडीक जमीन विकत घेऊन तेथे द्राक्षबाग लावली. मात्र दोन्ही बाजूने नाले असल्याने द्राक्षशेतीत फारसा फायदा झाला नाही. निराश न होता त्यांनी भाजीपाला उत्पादनाकडे लक्ष वळविले. शेतीसोबत जोडधंदा केल्यास निसर्गाच्या लहरीपणामुळे अधिक नुकसान होणार नाही हे लक्षात घेऊन त्यांनी पोल्ट्री व्यवसायाकडे लक्ष वळविले.
पशुसंवर्धन विभागाकडून त्यांनी 10 शेळ्याचा गट अनुदानावर मिळविला. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत दोन वर्षांपूर्वी नर्सरी सुरू केली. त्यातील आंब्याची कलमे शेताच्या बांधावर लावली आहेत. आपल्या श्रमाला त्यांनी कल्पकतेची जोड दिली. दोन पोल्ट्री युनिटमधील मोकळ्या जागेत पारंपरिक पद्धतीने चारा उत्पादन केल्यास उंदरांचा त्रास वाढेल म्हणून त्यांनी तेथील काळी माती गरजू शेतकऱ्याला विकली. त्याखालचा मुरूमदेखील उपयोगात आणला. तयार झालेल्या 100 बाय 40 बाय 7 फूट आकाराच्या खड्यावर प्लास्टीक टाकून त्यांनी मत्स्य व्यवसाय सुरू केला.
मांगूर जातीच्या मांसाहारी माशांसाठी पोल्ट्रीतीर कोंबड्यांचा खाद्य म्हणून उपयोग होऊ लागला. कालांतराने त्यांनी काँक्रीटचे तळे करून त्यात मत्स्यपालन सुरू केले. ठराविक दिवसांनी पाणी उपसताना ते नियोजनाने पिकांसाठी वापरण्यात येते. शेतात ठिबक सिंचन सुविधा करण्यात आली आहे.
आज मत्स्यपालनातून वार्षिक 6 लाख, तीन पोल्ट्री युनिटमधून साधारण 5 लाख आणि भाजीपाला उत्पादनातून 6 लाख असे उत्पन्न त्यांना मिळते आहे. चौथ्या पोल्ट्री युनिटची तयारी त्यांनी सुरू केली आहे. कुक्कुटपालनात एका बॅचला नऊ हजाराप्रमाणे वर्षाला सहा बॅच निघत असल्याचे पिंगळे सांगतात. त्यांच्याकडील शेळ्यांची संख्या 30 वर पोहोचली आहे. शेतात पेरूची बाग आहे. टमाटे, वाल, गिलके, चवळी आदी मोसमी भाजीपाला उत्पादन करून ते नाशिकच्या बाजारात विक्रीसाठी नेले जाते.
शेतातील प्रत्येक कोपऱ्याचा उपयोग त्यांनी उत्पादन वाढीसाठी करून घेतला आहे. उदाहरणादाखल काही आरे जागेत ट्रॅक्टर जाणे शक्य नसल्याने त्यांनी त्या जागी गवती चहाचा वाफा लावून जागेचा उपयोग करून घेतला. तळ्यातच दहा बाय दहाची जाळी टाकून त्यात यावर्षी झिंगा पालन सुरू केले आहे. एका वर्षात 4000 किलोचे उत्पादन होईल, असा विश्वास त्यांना आहे.
कल्पकता, श्रम आणि नियोजनाचा सुरेख समन्वय केल्याने अशोक पिंगळे यांना शेती फायदेशीर ठरली आहे. शेतातल्या प्रयोगातून नवा अनुभव घेत त्यांनी समृद्ध शेतीकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. ही वाटचाल इतरांनाही प्रेरणादायी अशीच आहे.
अशोक पिंगळे- जोडधंद्यातील उत्पन्न असले तर शेती तोट्यात जाणार नाही. एका फूटात काय करता येईल याचा विचार केल्याने मला जास्त उत्पन्न घेणे शक्य झाले. शेतातले श्रम वाया जात नाहीत. मात्र त्या श्रमामागे विचार निश्चित हवा.