अवकाळी पावसात असे करा द्राक्ष बागेचे व्यवस्थापन याप्रकारे करा फवारणी
23-03-2023

अवकाळी पावसात असे करा द्राक्ष बागेचे व्यवस्थापन याप्रकारे करा फवारणी
अवकाळी पाऊस झाल्यास पाने व द्राक्षमणी नैसर्गिकरित्या सुकू देणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. पाऊस चालू असल्यास कोणतीही फवारणी करू नये.
मागील काही दिवसांमध्ये द्राक्ष पट्ट्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपीट झाली. काढणीच्या अवस्थेत असलेल्या बागांमध्ये या पावसामुळे मोठे नुकसान झाले.
या पावसामुळे व तापमानात अचानक झालेल्या घटीमुळे द्राक्घडांमध्ये पाणी जाऊन क्रॅकिंगची व घड सडण्याची समस्या दिसून येत आहे. निर्यातक्षम द्राक्षावरही विपरीत परिणाम होत असल्याने द्राक्ष निर्यातीलाही फटका बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
अवकाळी पावसामुळे द्राक्ष मण्यांना (विशेषतः रंगीत जातीमध्ये) तडे जाण्याची शक्यता असते. यामुळे घड सडण्यासारख्या मोठया समस्या उद्भवू शकतात.
पावसाची स्थिती पुढील २-३ दिवस अशीच राहिल्यास द्राक्ष बागा अडचणीत येऊ शकतात. अशा स्थितीमध्ये नुकसान टाळण्यासाठी पुढील उपाययोजना महत्त्वाच्या ठरू शकतील.
- अवकाळी पाऊस झाल्यास पाने व द्राक्षमणी नैसर्गिकरित्या सुकू देणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. पाऊस चालू असल्यास कोणतीही फवारणी करू नये.
- पाऊस झाल्यानंतर बागेला पाणी देणे टाळावे. अतिरिक्त पाणी शोषले जाऊन पेशींमधील दाब वाढल्याने होणारे मणी तडकण्याचे प्रमाण कमी होईल.
- १२ तासांपेक्षा जास्त वेळ पानांवरील ओलावा टिकून राहत असल्यास, मणी क्रॅकिंग टाळण्यासाठी कायटोसॅन २ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.
- मण्यांमधील पेशी भित्तिका मजबूत करण्यासाठी, कॅल्शिअम क्लोराईड किंवा नायट्रेटची २ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.
- पावसामुळे द्राक्षघडांमध्ये साठलेले पाणी काढून टाकण्यासाठी तारेला झटका द्यावा.
- याचबरोबर पाणी काढून टाकण्यासाठी फलोत्पादन ग्रेड च्या खनिज तेलाचा (मिनरल ऑइल) २ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे वापर करावा. हा वापर दाटीने असलेल्या आणि शिफारस केलेल्या पेक्षा जास्त भार असलेल्या घडांच्या बाबतीत करता येईल.
- बागेतील वेलींची पाने लवकरात लवकर सुकण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या काही विशेष रसायनांचा वापरही केला जाऊ शकतो.
- या वातावरणात कोणत्याही टॉनिकचा वापर करू नये.
- या अवकाळी पावसामुळे वातावरणातील तापमानात अचानक घट होऊन मण्यांवर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव आढळून येऊ शकतो. असा प्रादुर्भाव दिसल्यास द्राक्ष घड सिलिकॉनयुक्त सरफॅक्टन्ट १ ते २ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे धुवून काढावेत.
- लाल कोळीचा प्रादुर्भाव आढळल्यास सल्फरची धुरळणी एकरी ५ ते ६ किलो या प्रमाणे करावी. यामुळे भुरी रोगावरसुद्धा नियंत्रण मिळते.
- मात्र याचा वापर करताना मण्यांवर कुठल्याही प्रकारचे डाग येणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
डॉ. सुजॉय साहा, (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)
source : agrowon