कपाशी, सोयाबीन, तूर पिकातील अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन
27-07-2023

कपाशी, सोयाबीन, तूर पिकातील अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन
कपाशी, सोयाबीन, तूर या पिकांमध्ये वाढीच्या अवस्थेत शिफारशीनुसार खतांच्या मात्रा देणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ मिळविणे शक्य होते.
कपाशी ः
- बागायती लागवडीमध्ये दोन ओळीतील अंतर वाढविल्यास झाडांमध्ये सूर्यप्रकाश व हवा खेळती राहून कायिक वाढ समाधानकारक होते. त्याचा बोंडे लागणे व पक्व होण्यास फायदा होतो. दोन ओळींतील अंतर वाढवून दोन झाडांमधील अंतर कमी केल्याने हेक्टरी झाडांची संख्या समान राखली जाते.
- हेक्टरी ५ ते १० टन शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. खत कमी उपलब्ध असल्यास पेरणीच्या फुलीपासून ५ सेंमी बाजूला सरत्याने द्यावे.
- नत्र, स्फुरद आणि पालाश या खतांच्या संतुलित व शिफारस मात्रेत वापर करावा. बागायती बीटी कपाशीसाठी नत्राची मात्रा तीन समान हप्त्यांत विभागून द्यावी.
- शिफारशीपेक्षा अधिक प्रमाणात नत्राचा वापर टाळावा. सघन लागवडीसाठी रासायनिक खतांची मात्रा २५ टक्के जास्त वापरावी.
- ठिबक सिंचनाद्वारे रासायनिक खतांच्या मात्रा १०० दिवसांपर्यंत विभागून देण्याचे नियोजन करावे.
- सूक्ष्म मूलद्रव्यांची जमिनीत कमतरता असल्यास, झिंक सल्फेट २० किलो, मॅग्नेशिअम सल्फेट २० किलो आणि बोरॉन ५ किलो प्रति हेक्टर प्रमाणे आवश्यकतेनुसार जमिनीतून द्यावे.
- पीक फुलोऱ्यावर असताना ४५ व ६५ व्या दिवशी २ टक्के युरिया किंवा १९:१९:१९ ची ०.५ टक्के प्रमाणे फवारणी करावी. किंवा फुलोरा अवस्थेत ०:५२:३४ ची ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
- बोंडे भरण्याच्या अवस्थेत, २ टक्के डीएपी किंवा पाती, फुले व बोंडे तयार होण्याच्या अवस्थेत १ टक्के पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी करावी.
- ‘लाल्या’चा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी शिफारस खतमात्रेसोबत, फुलोरा अवस्थेत २ टक्के युरिया आणि बोंडे परिपक्व होताना, युरिया (१ टक्का) अधिक मॅग्नेशिअम सल्फेट (१ टक्का) प्रमाणे फवारणी करावी. किंवा फुले व बोंडे लागण्याच्या वेळी मॅग्नेशिअम सल्फेटची (०.२ टक्का) फवारणी करावी.
- पात्या, फुले व बोंडे गळ कमी करण्यासाठी, एन.ए.ए. ३ ते ४ मिलि प्रमाणे १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. त्यानंतर १५ ते २० दिवसांनी दुसरी फवारणी घ्यावी.
- पिकाची कायिक वाढ आटोपशीर (फांद्यांची लांबी व उंची कमी) ठेवण्याकारिता व बोंडे कमी लागत असल्यास, वाढ नियंत्रक मेपीक्वाट क्लोराइड २ मिलि प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. ही फवारणी पाते व फुले येण्यावेळी दोन वेळा जमिनीत पुरेशी ओल असताना करावी. किंवा पीक साधारण ५ फूट उंचीचे झाल्यावर (९० ते १०० दिवसांनी) शेंडा खुडणे.
महत्त्वाच्या शिफारशी ः
ठिबक सिंचनाद्वारे शिफारशीच्या १०० टक्के नत्र व पालाश ५ वेळा विभागून तसेच स्फुरद पेरणीसोबत जमिनीतून देण्याची शिफारस विद्यापीठाची आहे. खतांची मात्रा ठिबक सिंचनाद्वारे विभागून द्यावी.
ठिबक सिंचनातून द्यावयाची मात्रा ः
खतमात्रा | पिकाची अवस्था (पेरणीनंतरचे दिवस) | |
---|---|---|
1. | शिफारशीच्या १० टक्के नत्र व पालाश | पेरणीवेळी |
2. | शिफारशीच्या २० टक्के नत्र व पालाश | पेरणीनंतर २० दिवसांनी |
3. | शिफारशीच्या २५ टक्के नत्र व पालाश | पेरणीनंतर ४० दिवसांनी |
4. | शिफारशीच्या २५ टक्के नत्र व पालाश | पेरणीनंतर ६० दिवसांनी |
5. | शिफारशीच्या २० टक्के नत्र व पालाश | पेरणीनंतर ८० दिवसांनी |
खोल काळ्या जमिनीत संकरित कापसाचे अधिक उत्पादन, अन्नद्रव्यांची कार्यक्षमता आणि जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी हेक्टरी ७५ टक्के शिफारशीत (७५:३७.५:३७.५ नत्र, स्फुरद, पालाश किलो/हेक्टरी) खत मात्रेसोबत जस्त ३ किलो, लोह ३.७५ किलो प्रति हेक्टर प्रमाणे विद्राव्य खतातून ५ वेळा (लागवडीच्या वेळी, ३५, ५५, ७५ व ९५ दिवसांनी) विभागून ठिबकद्वारे द्यावे.
कालावधी | खतांची टक्केवारीत विभागणी ०० | |||
---|---|---|---|---|
नत्र | स्फुरद | पालाश | ||
1. | पेरणीच्या वेळी | २० | २५ | २० |
2. | पेरणीनंतर ३५ दिवसांनी | २० | २५ | २० |
3. | पेरणीनंतर ५५ दिवसांनी | २० | २५ | २० |
4. | पेरणीनंतर ७५ दिवसांनी | २० | २५ | २० |
5. | पेरणीनंतर ९५ दिवसांनी | २० | ०० | २० |
सोयाबीन ः
- जमिनीत चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी ५ टन प्रमाणे वापरावे. त्यामुळे जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण योग्य चांगले राहून कर्बः नत्र गुणोत्तर योग्य राखले जाते.
- पेरणीवेळी हेक्टरी ३०:६०:३० किलो नत्र, स्फुरद व पालाश म्हणजेच युरिया ६५ किलो, सिंगल सुपर फॉस्फेट ३७५ किलो व म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो द्यावे.
- माती परीक्षणानुसार, आवश्यकता असल्यास सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीद्वारे किंवा जमिनीतून द्यावीत. तसेच झिंक सल्फेट २५ किलो आणि बोरॅक्स १० किलो द्यावे.
- मिश्र खते दिल्यास हेक्टरी २० ते ३० किलो गंधकाचा वापर अत्यंत आवश्यक आहे.
- पावसाचा खंड पडल्यास पोटॅशिअम नायट्रेट (१ टक्का) पहिली फवारणी ३५ व्या दिवशी आणि पोटॅशिअम नायट्रेट २ टक्क्याची दुसरी फवारणी ५५ व्या दिवशी करावी.
- पेरणीनंतर नत्र युक्त खतांचा वापर टाळावा.
- अधिक उत्पादनासाठी शिफारशीत खतमात्रेसोबत ५० व ७० दिवसांनी २ टक्के युरियाची (१०० लिटर पाण्यात २ किलो युरिया) फवारणी करावी. किंवा शेंगा धरण्याच्या अवस्थेत १९:१९:१९ (२ टक्के) फवारणी करावी.
विद्यापीठ शिफारशी ः
- पिकाची अवास्तव होणारी कायिक वाढ रोखण्यासाठी आणि अधिक उत्पादनासाठी वाढरोधक संजीवक क्लोरोमिक्वाट क्लोराइड (१००० पीपीएम) २ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे पेरणीनंतर ४० दिवसांनी फवारणी करावी.
- पिकास पाण्याचा ताण बसल्यास, पीक फुलोरा अवस्थेनंतर १५ दिवसांनी हेक्टरी ५ टन कुटार आच्छादनासोबतच पोटॅशिअम नायट्रेट १ टक्का किंवा मॅग्नेशिअम कार्बोनेट ५ टक्के यापैकी एकाची फवारणी करावी.
- चुनखडीयुक्त जमिनीमध्ये (सामू ८.० पेक्षा जास्त) फेरस सल्फेट ५० ग्रॅम अधिक कळीचा चुना २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पीक फुलावर येण्यापूर्वी व शेंगा धरण्याच्या अवस्थेत अशा दोन फवारण्या घ्याव्यात. यामुळे लोहाची कमतरतेमुळे पिकाची पाने पिवळी पडणार नाहीत.
तूर ः
- तूर पिकांस नत्र, स्फुरद आणि पालाश हेक्टरी २५ः२५ः३० किलो प्रमाणे पेरणीवेळी देण्याची शिफारस आहे. (युरिया, ५४ किलो, सिंगल सुपर फॉस्फेट ३१३ किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश ५१ किलो प्रति हेक्टर किंवा डायअमोनिअम फॉस्फेट १०९ किलो व म्युरेट ऑफ पोटॅश ५१ किलो)
- माती परीक्षण अहवालानुसार, कमतरता असल्यास गंधक २० किलो, झिंक सल्फेट १५ किलो प्रति हेक्टरी प्रमाणे द्यावे.
- कोरडवाहू तूर लागवडीत पीक फुलोऱ्यावर असताना, युरिया २० ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
source : agrowon