पीएम किसानचा 16 वा हप्ता याच महिन्यात येणार…!
17-02-2024

पीएम किसानचा 16 वा हप्ता याच महिन्यात येणार…!
देशभरातील शेतकऱ्यांना लवकरच मोठा दिलासा मिळेल. त्यांना पीएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याविषयी आनंदवार्ता मिळेल. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये मिळतात. जे शेतकरी योजनेपासून वंचित आहेत, त्यांना पण लॉटरी लागणार आहे.
देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नावाजलेल्या योजनांची अंमलबजावणी करते. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Yojana) ही लोकप्रिय योजना त्यातीलच एक आहे. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य करण्यात येते. दोन हजारांचे तीन हप्ते लाभार्थी, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरली आहे. शेतकरी या योजनेच्या 16 व्या हप्त्याची प्रतिक्षा करत आहेत. त्यांच्यासाठी आनंदवार्ता आली आहे. कधी जमा होणार हा हप्ता?
15 हप्ते झाले जमा
ऑक्टोबर 2022 मध्ये या योजनेतंर्गत 12 वा हप्ता जमा करण्यात आला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये 13 वा हप्ता जमा करण्यात आला. 27 जुलै रोजी 14 हप्ता जमा झाला. नोव्हेंबर महिन्यात केंद्राने 15 वा हप्ता जमा केला होता. साधारणतः पाच महिन्यांच्या अंतराने रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती झाली आहे. आता 16 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणे एकूण 6 हजार रुपये देण्यात येतात. DBT माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते.
वंचित शेतकऱ्यांना पण लाभ
अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ बंद झाला आहे. कागदपत्रांची पूर्तता न केल्याने हप्ता थांबविण्यात आला आहे. आता ही अडचण दूर करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय या खास मोहिम राबविणार आहे. 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी अभियान राबविण्यात येईल. या अभियानात प्रत्येक राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा सहभाग असेल. देशभरातील 4 लाखांहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून गावोगावी हे अभियान राबविण्यात येणार आहे.
16 वा हप्ता कधी मिळणार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. या फेब्रुवारी अथवा पुढील मार्च महिन्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. अर्थात केंद्र सरकारने याविषयीची अधिकृत घोषणा केलेली नाही.