पीएम प्रणाम योजना: रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचा उपाय...
17-11-2024

पीएम प्रणाम योजना: रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचा उपाय…
देशामध्ये दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वापर वाढत चालला असून यामुळे जमीन, पाणी व हवा दूषित होत आहे. त्यामुळे सजिवांच्या आरोग्यास हानी पोहचत असून पिकांचे उत्पादन व उत्पादकता यांवरही विपरित परिणाम झालेला आहे. म्हणून केंद्र सरकारने २०२३-२४ मध्ये 'पीएम प्रणाम' ही योजना सुरू केली आहे.
राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात चळवळ उभी करुन पृथ्वी मातेचे आरोग्य पुनर्पस्थापित करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी सहकार्य करणे, नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणे, सेंद्रिय व जैविक खतांच्या वापरास चालना देणे तसेच संसाधने संवर्धन तंत्रज्ञानास प्रोत्साहन देणे ही योजनेची उद्दिष्टे आहेत.
या योजने अंतर्गत अनुदानित रासायनिक खते जसे की, युरिया, डीएपी, संयुक्त खते आणि एमओपी या खतांचा वापर कमी करुन, राज्याने मागील तीन वर्षाच्या सरासरी पेक्षा कमी वापर केल्यामुळे केंद्राच्या बचत झालेल्या अनुदानापैकी ५० टक्के अनुदान हे केंद्राकडून राज्यांना निधी म्हणून दिले जाईल.
सदर निधीचा वापर राज्यांनी सेंद्रिय, नैसर्गिक व जैविक खते यांचे उत्पादन व वापर यांच्याशी संबंधित गोष्टींवर करावयाचा आहे. यामुळे जमिनीची सुपिकता वाढणे, खतांचा निचरा झाल्यामुळे होणारे भुजल साठ्याचे दुषितीकरण कमी होणे व हरितगृह वायू उत्सर्जन कमी होऊन जमीनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढणे हे फायदे होणार आहेत.
शेतकऱ्यांनीही नैसर्गिक, सेंद्रिय व जैविक खतांना प्राधान्य द्यावे, याच बरोबर शेतातोल पालापाचोळा जाळून न टाकता कुजवून त्याचा वापर करावा. तसेच जनावरे गोठा यातील शेण, मलमुत्र व इतर काडीकचरा यांचे वर प्रक्रिया करून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.