Onion Market :कांद्याचा भाव वाढण्याची शक्यता; खरीप कांदा बाजारात दाखल.
26-10-2023

Onion Market :कांद्याचा भाव वाढण्याची शक्यता; खरीप कांदा बाजारात दाखल.
या वर्षी पाऊसमान कमी असल्याने जिल्ह्यात यंदा खरीप कांदा लागवडीत मोठी घट झाली आहे. प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन खरीप लाल कांद्याच्या लिलावाला प्रारंभ होत असतो.
यंदा लागवडी उशिरावर गेल्याने बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांचा कांदा काढणीला आहे. मात्र आवकेसह गुणवत्ताही जेमतेम असल्याची एकंदरीत स्थिती आहे. उन्हाळ कांद्याची प्रतवारी घडली आहे, दुसरीकडे सड होऊन साठा अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे खरीप लाल कांद्याचे घटलेले उत्पादन व नवीन कांदा पुरवठ्यात तुटीमुळे दरात तेजी राहण्याची चिन्हे आहेत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले
मात्र यंदा आवक सर्वसाधारण असल्याची स्थिती आहे. इतर बाजारात, उमराणे येथे स्थित श्री रामेश्वर कृषी मार्केट आणि मालेगाव बाजार समितीच्या मुंगसे उपबाजारात प्रतिक्विंटल ११,१११ रुपये उच्चांकी दराने दिल्या.
देवळा तालुक्यातील महात्मा फुले नगर येथील श्री रामेश्वर कृषी मार्केटमध्ये २१७ वाहनांमधून खरीप लाल कांद्याची ११८५ क्विंटल आवक झाली. खडकतळे (ता. देवळा) येथील कैलास तानाजी पगार यांच्या मालाला उच्चांकी ११,१११ रुपयांची बोली लागली. कांद्याला प्रतिक्विंटल किमान ५०० ते कमाल ११,१११ तर सरासरी ३,०५८ रुपये दर मिळाला. लिलावप्रसंगी नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू काका देवरे, उमराणेचे माजी सरपंच प्रकाश ओस्तवाल, श्रीरामेश्वर कृषी मार्केटचे संचालक श्रीपाद ओस्तवाल, संचालक पुंडलिक देवरे, सचिव दौलतराव शिंदे, व्यापारी संतोष बाफना, प्रवीण बाफना, दिनेश देवरे, योगेश पगार, दीपक गांगुर्डे, चिंधू खैरे, नितीन काला, उज्ज्वल देवरे आदींसह शेतकरी, हमाल, मापारी उपस्थित होते.
मुंगसे उपबाजारात उपसभापती विनोद चव्हाण यांच्या हस्ते लिलाव झाला. मुंगसे येथील शेतकरी सुधाकर रौंदळ यांनी मुहूर्तावेळी बैलगाडीतून आणलेल्या कांद्यास सर्वोच्च ११ हजार १११ रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. राहुल आडतचे संचालक व कांदा व्यापारी राहुल सूर्यवंशी यांनी बोली लावत ११ हजार १११ रुपये दराने नवीन खरीप लाल कांदा खरेदी केला. येथे ११९ वाहनांतून १,१९० क्विंटल आवक झाली होती. त्यास प्रतिक्विंटल किमान १,०५० ते कमाल ११,१११ तर सरासरी ३२५० रुपये दर मिळाले.