मान्सूनची परतीची प्रक्रिया सुरू महाराष्ट्रात लवकरच परतीची शक्यता...
09-10-2024

मान्सूनची परतीची प्रक्रिया सुरू महाराष्ट्रात लवकरच परतीची शक्यता...
अतिशय अल्पशा विश्रांतीनंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला आहे, बुधवारी वायव्य भारताच्या बऱ्याच भागांमधून मान्सूनने काढता पाय घेतला. येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांतून मान्सून परतण्यास पोषक हवामान आहे, असे हवामान खात्याने संगितले.
यंदा खरंतर मान्सूनच्या परत जाण्याचा प्रवास चांगला लांबला आहे. महाराष्ट्रातून संपूर्णपणे मान्सून परत जाण्यासाठी कदाचित १० ऑक्टोबरचा दिवस उजाडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी २३ सप्टेंबर रोजी वायव्य राजस्थान आणि कच्छमधून परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागांसह पंजाब, हरयाणाच्या काही भागांमधून मान्सून परतला, परंतु, मान्सूनची वाटचाल मात्र थांबली.
आता बुधवारी तब्बल आठ दिवसांनी मान्सूनने परतीचा प्रवास पुन्हा सुरू केला. मान्सूनने लखीमपूर, खेरी, शिवपुरी, कोटा, उदयपूर, दिसा, सुरेंद्रनगर, जुनागडपर्यंतच्या भागांतून मान्सून परतला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.