रब्बी हंगामासाठी खतांची अधिक मागणी आणि पेरणीचा अंदाज...
08-11-2024

रब्बी हंगामासाठी खतांची अधिक मागणी आणि पेरणीचा अंदाज…
यंदा वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने लातूर जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे खतही अधिक प्रमाणात लागणार असल्याचे गृहित धरून कृषी विभागाने खतांची अधिकची मागणी केली आहे. जिल्ह्यात ३ लाख ८२ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रावर पेरा अपेक्षित आहे.
सध्या ४२ हजार ९८९ मे. टन खत उपलब्ध आहे. यंदाच्या पावसाळ्यात वेळेवर आणि सातत्याने पर्जन्यमान झाल्याने नदी नाले वाहिले. तसेच लघू व मध्यम प्रकल्पांत भरपूर जलसाठा झाला. त्याचा लाभ रब्बी हंगामासाठी होत आहे.
खरिपातील सोयाबीनच्या राशी आटोपून काही शेतकरी रब्बीची तयारी करीत आहेत, तर काही शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केला आहे. जिल्ह्यात हरभऱ्याचा सर्वाधिक पेरा....
जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ३ लाख ८२ हजार ५३७ हेक्टर प्रस्तावित आहे. त्यात सर्वाधिक २ लाख ७६ हजार ९५२ हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा होणे अपेक्षित आहे.
तसेच ज्वारी ७१ हजार ४, मका २ हजार ६३, गहू १० हजार ५३२, जवस १८०, सूर्यफूल ८६, करडई २१ हजार ७२० हेक्टवर पेरा होईल, असा अंदाज जिल्हा कृषी विभागाने वर्तविला आहे.
९७ हजार मे. टन खताची मागणी...
- रब्बी हंगामासाठी सरासरी ४७ हजार २२ मे. टन खतांचा वापर होतो. पण, यंदा पेरा वाढणार असल्याने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ९७ हजार ६०२ मे. टन रासायनिक खतांची मागणी केली होती.
- आयुक्तालयामार्फत ७६ हजार ३९१ मे. टन आवंटन प्राप्त झाले आहे. ऑक्टोबरपासून आतापर्यंत रब्बीसाठी ६ हजार ७२८ मे. टन खत उपलब्ध असून, सप्टेंबरअखेरपर्यंत शिल्लक ४७ हजार ६३५ मे. टन खत शिल्लक राहिला होता.
आतापर्यंत ११ हजार मे. टन खत विक्री...
रब्बीसाठी जिल्ह्यास ५४ हजार ३६३ मे. टन खत उपलब्ध झाले होते. त्यापैकी ११ हजार ३७४ मे. टन खताची विक्री झाली आहे. सध्या ४२ हजार ९८९ मे. टन शिल्लक आहे. त्यात युरिया १६६८५, डीएपी- १४९५, एमओपी - १२२५, एनपीके - १३१०६, एसएसपी- १०४७८ मे. टन खत शिल्लक आहे.
जिल्हा कृषी विभागाकडून दक्षता...
जिल्ह्यामध्ये ३ लाख ८२ हजार ५३७ हेक्टरवर रब्बीचा पेरा होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवून ऐनवेळी बी-बियाणे, खतांचा तुटवडा होऊ नये म्हणून आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे. सध्या शेतकरी रब्बी हंगामपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे पहावयास मिळत आहे. परतीच्या पावसामुळे काही ठिकाणच्या शेतात अद्यापही चिखल आहे.