माती परिक्षणाचे महत्व आणि मातीचा नमुना घेण्याची पध्दत

10-04-2023

माती परिक्षणाचे महत्व आणि मातीचा नमुना घेण्याची पध्दत

माती परिक्षणाचे महत्व आणि मातीचा नमुना घेण्याची पध्दत 

माती परिक्षणाचे महत्व

मातीचा प्रातिनिधिक नमुना तयार करणे ही माती परिक्षणाची सर्वात महत्त्वाची कृती होय. या नमुन्याचे रासायनिक पृथ:करण बऱ्याच अंशी अचूक सुपीकता दाखविते.

माती परिक्षण म्हणजे शेत जमिनीतील माती नमुन्याचे प्रामुख्याने रासायनिक पृथ:करण करून त्यातील उपलब्ध मुख्य (नत्र, स्फुरद, पालाश), दुय्यम (कॅल्शियम, मॅग्नेशियम व गंधक) व सुक्ष्म अन्नद्रव्यांचे (लोह, जस्त, मंगल, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम इत्यादी.) प्रमाण तपासणे होय, आवश्यक असल्यास जमिनीची भौतिक व जैविक गुणधर्माची तपासणी सुध्दा केली जाते.

मातीचा नमुना केव्हा घ्यावा

  1. मातीचा नमुना वर्षातून केंव्हाही आवश्यक असेल तेव्हा घेता येतो, पंरतू शक्यतो रब्बी पिकांची काढणीनंतर किंवा उन्हाळयात घेतल्यास पृथ:करण करून परिक्षण अहवाल पेरणीपर्यंत उपलब्ध होतो.
  2. पिकाच्या काढणीनंतरच्या काही वेळेस जमिनी कोरड्या असताना घ्यावा. 
  3. जमिनीवर पीक उभे असताना मातीचा नमुना घ्यावयाचा असेल, तर खते दिल्यानंतर दोन महिन्यांनी मातीचा नमुना पिकांच्या दोन ओळीमधून घ्यावा.
  4. कोणत्याही परिस्थितीत पिकांना दिलेल्या खताच्या मात्रेनंतर लगेचच मातीचा नमुना घेवू नये.

मातीचा नमुना घेण्याची पध्दती

प्रथम शेतात फेरफटका मारून निरीक्षण करा. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकांचा रंग, वाढ भिन्नभिन्न असते, तसेच जमिनीच्या पृष्टभागावरचा रंग देखील वेगवेगळा असतो. उतारावरील जमीन भुरकट रंगाची असते, सखल भागातील काळी असते. म्हणूनच उतार, रंग, पोत, खोली, व्यवस्थापन व पीक पध्दती नुसार विभागणी करावी, प्रत्येक विभागातून स्वंतंत्ररित्या नमुना घ्यावा.

  1. एक सारख्या जमिनीतून नमुना घेताना काडी कचरा, गवत पिकांची धसकटे व मुळे काढून टाका.
  2. जिथे पिकांची ओळीत पेरणी केली असेल अशा ठिकाणी दोन ओळीमधून नमुना घ्या.
  3. नुकतेच खते टाकलेल्या जमिनी, खोलगट भाग, पानथळ जागा, झाडाखालील जमीन, बांधाजवळील जागा, शेणखताच्या ढिगाऱ्याजवळील जागा शेतातील बांधकामाजवळचा परिसर, कंपोस्ट खतांच्या जवळपासची जागा अशा ठिकाणातून मातीचा नमुना घेवू नका. 
  4. सपाट पृष्ठभाग असलेल्या जमिनीवर ३० x ४५ सेमी इंग्रजी व्ही (V) आकाराचा चौकोनी खड्डा करून आतील माती बाहेर काढून टाका. खड्डयांच्या दोन्ही बाजूची २ सेमी जाडीची माती खुरप्याच्या साहाय्याने वरपासून खालपर्यंत खरडून हातावर काढा आणि प्लॅस्टिकच्या बादलीत टाका. अशारितीने एका प्रभागातून १० नमुने घेऊन त्याच बादलीत टाका.
  5. V आकाराचा पिकांच्या मुळांच्या विस्तारानुसार 30 सें.मी. ते 45 सें.मी खोलीचा खड्डा घ्यावा. खड्डयाची एक बाजू कापून घ्यावी.
  6. नवीन फळबागांसाठी नमुना घेताना 0-30 सें.मी. 31-60 सें.मी. 01-90 से. मी. प्रमाणे तीन ठिकाणाची माती नमुन्यासाठी वेगळी घ्यावी.
  7. फळबागेसाठी मातीचा नमुना वेगवेगळ्या थरामधून घ्यावा उदा. खड्डा खोदुन पहिल्या एक फुटातील ३० सेमीपर्यंत मुरूम नसल्यास ३० ते ६० सेंमी थरातील दुसरा थर व खोल जमिनीत ६० ते ९० सेंमी पर्यंत खोलीतील तिसऱ्या थरातील मातीचे नमुने स्वतंत्र घ्यावे व प्रयोगशाळेत पाठवावे.
  8. ही सर्व माती एका स्वच्छ प्लॅस्टिकच्या कागदावर टाका. चांगली मिसळा, ओली असल्यास सावतील वाळवा नंतर या ढिगाचे चार समान भाग करा.
  9. समोरासमोरील दोन भाग काढून टाका. उरलेले दोन भाग एकत्र मिसळा व पुन्हा चार भाग करा. ही प्रक्रिया एक किलो ग्रॅम माती शिल्लक राहीपर्यंत करा.
  10. उरलेली अंदाजे एक किलो वाळवलेली माती स्वच्छ पिशवीत भरा पिशवीत माहिती पत्रक टाका व एक लेबल पिशवीला बांधा.
  11. शक्य तितक्या लवकर नमुने प्रयोगशाळेत पाठवा. सर्वसाधारणपणे नमुना गोळा करणे व प्रयोगशाळेत पाठविणे हयात दोन आठवडयापेक्षा अधिक काळ नसावा. अन्यथा माती पृथ:करण बदलण्याची शक्यता आहे.
  12. जमीन क्षारयुक्त व क्षारयुक्त चोपण असल्यास पृष्ठभागावरील दोन सेंमी मधील क्षार - बाजूला करून नंतरच नमुना घ्यावा.
  13. सूक्ष्म अन्नद्रव्ये तपासणी करावयाची असल्यास लाकडी खुंटी औजाराने मातीचा नमुना घ्यावा कोणत्याही परिस्थितीत लोखंडी अवजारे, उपकरणे, माती नमुने घेण्यासाठी वापरू नका. 
  14. नमुना स्वच्छ पिशवीत भरून सूक्ष्मअन्नद्रव्यांसाठी माती नमुना घेताना जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. पिशवीवर सूक्ष्मअन्नद्रव्ये तपासणीसाठी नमुना अशी नोंद करावी.

मातीचे नमुना कोठे व कसा पाठवावा

मातीचा नमुना घेतल्यानंतर खालील माहिती लिहून ती मातीचा नमुना असलेल्या पिशवीत टाकावी, मातीचा नमुना लवकरात लवकर जवळच्या माती परिक्षण प्रयोगशाळेकडे पाठवावा.

  1. शेतकऱ्यांचे नाव
  2. बागायत / कोरडवाहू
  3. जमिनीचा प्रकार
  4. ओलिताचे साधन
  5. जमिनीचा उतार
  6. गट नंबर / स.न.
  7. जमिनीचा निचरा
  8. जमिनीची खोली
  9. नमुना घेतल्याची तारीख
  10. पुर्ण पत्ता
  11. मागील हंगामात घेतलेले पीक व त्याचे उत्पादन वापरलेली खते व त्यांचे प्रमाण 
  12. पुढील हंगामात घ्यावयाची पिके, त्यांची जात व अपेक्षित उत्पादन

सर्व माहिती सविस्तर भरून मातीचा नमुना माती परिक्षण प्रयोगशाळेकडे पाठवावा.

त्यानंतर तुम्हाला माती परिक्षण अहवाल आणि माती परिक्षणानुसार खतांची शिफारस
याबद्दल माहिती दिली जाईल. 

 

source : ffp.icar.gov.in

Importance of soil testing and methods of soil sampling, soil testing, mati parikshan, शेतीत कोणत पिकं घेतल पाहिजे

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading