ऊस लागवड तंत्रज्ञान
27-09-2023

ऊस लागवड तंत्रज्ञान
उसाची लागवड सुरू, पूर्व हंगामी व आडसाली या तीन हंगामात केली जाते. आडसाली हंगामातील (जुलै-ऑगस्ट) पीक हे अनुकूल हवामानामुळे जोमदार वाढते. तसेच आडसालीच्या पीक वाढीच्या १६-१८ महिन्याच्या कालावधीत दोन पावसाळी हंगामाचा फायदा मिळाल्याने सुरू हंगामाच्या दीडपट उत्पादन मिळते. पूर्वहंगामी ऊससुद्धा १४-१५ महिन्यांचा असल्याने त्याचे उत्पादनही चांगले मिळते.
ही एक तृणवर्गीय वनस्पती आहे. ऊस मुख्यत्वे, गुळासाठी, साखरेसाठी पिकवण्यात येतो. भारत व ब्राझील या देशांत हा प्रामुख्याने पेरला जातो. भारतात महाराष्ट्र व उत्तर प्रदेश ही राज्ये ऊस पिकवण्यात अग्रेसर आहेत.
पिकवण्याच्या पद्धती व वापर :-
ऊस हे वार्षिक पीक आहे. उसाच्या पेरापासून (खोडाच्या तुकड्यापासून) नवीन रोप लावतात. उसाला काळी कसदार जमीन लागते, कारण उसाला खूप पोषकद्रव्ये लागतात. लागण व खोडवा या ऊस पिकवण्याच्या २ पद्धती आहेत. उसापासून मोठया प्रमाणात साखर मिळते.
हवामान :-
ऊसावर हवामानातील तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान आणि सुर्यप्रकाश या घटकांचा परिणाम होतो. ऊस लवकर उगवणीसाठी वातावरणातील तापमान १० डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी नसावे. वाढीच्या अवस्थेत उसाला २५ डिग्री ते ३५ डिग्री से.च्या दरम्यान तापमान, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता व चांगला सूर्यप्रकाश उपयुक्त ठरतो.
लागवड :-
लागवड पट्टा पद्धतीत २.५ फूट किंवा ३ ६ फूट अंतरावर केल्यास उसाची वाढ जोमदार होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.
उसाची लागवड करण्याअगोदर रोग व कीडप्रतिबंधक उपाय म्हणून १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम आणि ३०० मि.लि. मॅलेथिऑन प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करतात. त्यामध्ये टिपरी १० ते १५ मिनिटे बुडवून नंतरच लागण करतात.
उसाची लागण करतेवेळी आडसाली उसाला हेक्टरी ४०० किलो नत्र, १७० किलो स्फुरद आणि १७० किलो पालाश देतात. पूर्वहंगामामध्ये हेक्टरी ३४० किलो नत्र, १७० किलो स्फुरद आणि १७० किलो पालाश देतात. खतमात्रा मातीपरीक्षणानुसारच देणे योग्य असते. या शिफारशीत खतमात्रेमधून लागवडीच्यावेळी दहा टक्के नत्र, ५० टक्के स्फुरद आणि ५० टक्के पालाश या प्रमाणात देतात. उरलेली खते (स्फुरद व पालाश) मोठ्या बांधणीवेळी देतात. नत्राची ४० टक्के मात्रा ४५व्या दिवशी, दहा टक्के मात्रा ९०व्या दिवशी आणि ४० टक्के मात्रा मोठ्या बांधणीवेळी देतात, तसेच सल्फर या खताची मात्रा लागणीवेळी ६० किलो प्रति हेक्टरी शेणखतात मिसळून देतात.