उन्हाळी सुर्यफुल सुधारित लागवड तंत्र

28-02-2024

उन्हाळी सुर्यफुल सुधारित लागवड तंत्र

उन्हाळी सुर्यफुल सुधारित लागवड तंत्र

 
सुर्यफुलाची लागवड खरीप, रब्बी व उन्हाळी या तिन्ही हंगामामध्ये करता येते. सुर्यफुल हे अवर्षण परिस्थिती सुद्धा सहन करणारे पिक आहे. सुर्यफुल तेलामध्ये अधिक प्रमाणात असलेल्या लिनोलेईक आम्लामुळे या तेलाचे आहारातील महत्व वाढलेले आहे. उन्हाळी सुर्यफुल हे फेरपालटीचे पिक म्हणुनही उपयोगी पडते. राज्यामध्ये प्रामुख्याने हे पिक मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महराष्ट्र या विभागात लागवड केले जाते.

सूर्यफूल हे पीक का पेरावे 

  • कमी कालावधीत ( ८० ते १०० दिवस ) पिक तयार होते.
  • तेलाचे प्रमाण ३५ ते ४५ टक्के असते.
  • आहाराच्या दुष्टीने करडई तेला खालोखाल सुर्यफुल तेल अतिउत्तम आहे.
  • बी वापर व उत्पादन यांचे गुणन प्रमाण इतर पिकापेक्षा जास्त आहे.
  • सर्व हंगामात हे पिक घेता येते.

जमीन:-

जमिनीची निवड करतांना जमिन ही मध्यम ते भारी व उत्तम निचरा होणारी निवडावी व जमिनीचा सामु ६ . ५ ते ८ इतका असावा.

हवामान:-

सुर्यफुलाची वाढ चांगली व उत्पादन येण्यसाठी ५०० मि.मी. पर्जन्यमान गरज आहे . पिक कालावधी व योग्य पाऊस असल्यास ३०० मि.मी. वार्षिक पर्जन्यामान देखील पिकास पुरेशे होते.
 

पेरणीचा कालावधी:-

उन्हाळी हंगामात सुर्यफुलाची पेरणी ही जानेवारीचा पहिला व फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवाडयात करावी.

लागवडीचे अंतर:-

मध्यम ते खोल जमीन (सुधारीत वाण) यासाठी अंतर ४५ X ३० से.मी. ठेवावे व या अंतरावर लागवड केल्यास रोपांची संख्या प्रतिहेक्टरी ७४००० इतकी राहील व भारी जमीनीत लागवडीचे अंतर हे ६० X ३० . मी . ठेवावे व या अंतरावर लागवड केल्यास प्रतिहेक्टरी रोपांची संख्या ५५००० इतकी राखली जाईल व संकरीत वाणासाठी अंतर हे ६० X ३० से.मी. ठेवावे . (रोपांची संख्या ५५००० प्रतिहेक्टरी इतकी राहील.)

बियाणे प्रमाण:-

पेरणीसाठी टोकन पद्धतीने संकरीत वाणाचे ५ ते ६ किलो बियाणे वापरावे व तिफणीने पेरणी केल्यास हेक्टरी संकरीत वाणाचे ८ ते १० किलो बियाणे वापरावे.

बीजप्रक्रिया:-

इमिडाक्लोप्रीड (७० टक्के डब्ल्यु . एस .) ५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी त्यामुळे नेक्रॉसिस या रोगांपासून या पिकाचे संरक्षण होते व पेरणीपूर्वी बियाण्यास २ ग्रॅम थायरम / बाविस्टीन चोळावे.

शिफारशीत जातींची निवड

सरळ वाण: मॉडर्न , पी . केव्ही . एस . एफ – ९ , टि . ए . एस ८२ , एस . एस ५६ , भानू , एल . एस . एफ -८ , फुले भास्कर , एल . एस -८ २.
संकरीत वाण: के . बी . एस . एच -१ , के.बी.एस.एच -४४ , फुले रविराज , डि . आर . एस . एच -१ , पी . केव्ही . एस . एच -२७ , एल . एस . एफ . ए . एच -१७१ .
विरळणी: एका जागेवर एकापेक्षा जास्त रोपे असतील तर एकच सशक्त रोप ठेवून विरळणी करावी अन्यथा सुर्यफुलाचा आकार लहान होवून उत्पादनात लक्षणीय घट येते म्हणून विरळणी ही पेरणीनंतर १० ते १५ दिवसांनी करावी त्यामुळे उत्पादनात १८ ते २३ टक्के वाढ होवू शकते .

पीक वाढीच्या अवस्थेनुसार पाणी व्यवस्थापन :

हलकी जमीन असल्यास पाण्याच्या सहा ते आठ पाळया , मध्यम जमीन चार ते पाच पाळया व भारी जमीनीस तीन ते चार पाळ्या देणे गरजेचे आहे . पीक वाढीच्या संवेदनशिल काळात पाण्याचा ताण पडु देवू नये याची काळजी घ्यावी जसे की कळी धरणे , फुल उमलने व दाणे भरणे या अवस्थेत पाणी वापराचे नियोजन करावे .

तण व्यवस्थापन:

पीक सुमारे २० दिवसाचे असतांना एक आणि ३० ते ३५ दिवसाचे असतांना दुसरी कोळपणी करावी तणाचे प्रमाण जास्त असल्यास एखादी खुरपनी करावी . अंतरमशागतीमुळे जमीनीत हवा खेळती राहुन पिकाची वाढ जोमाने होते पेरणीनंतर पहिल्याच दिवशी संध्याकाळच्या वेळेस पेंडीमिथॅलिन ची शिफरशीनुसार फवारणी करावी . फवारणी करतांना जमिनीत पुरेशी ओल असावी व नंतर ३५ दिवसांनी कोळपनी केल्यास तण नियंत्रण चांगल्या प्रकारे होते .

विशेष बाब :

१. फुले उमलण्याच्यावेळी पेरणीपासून ४५ ते ५५ दिवसांनी २० पी.पी.एम. ( एन.ए.ए. ) या संजिवकाची फवारणी केली असता दाणे भरण्याचे प्रमाण वाढते .
२. ०.२ टक्के प्रमाणात बोरॉनची फवारणी पिक फुलो – यात असतांना केल्यास पराग कणांची कार्यक्षमता सुधारून परागीभवनास त्याचा फायदा होतो व फुलात दाणे भरण्यास मदत होते .
३. २० किलो प्रतिहेक्टरी गंधकाचे प्रमाण आपण अमोनिअम सल्फेट किंवा एस . एस . पी . खतांतुन दिल्यास पिकाचे अधिक उत्पादन मिळते .

हस्तपरागीभवन :

पीक फुलो – यात असतांना ( ५० ते ६५ दिवस ) जातीनुसार हाताच्या पंजास तलम कापड गुंडाळावे व फुलावरून घडयाळयाच्या काटयाप्रमाणे हळुवारपणे हात फिरवावा हे काम ७ ते ८ दिवस सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत करावे यामुळे उत्पादनात भरघोस वाढ दिसून येते . सुर्यफुलामध्ये परपरागीभवनासाठी मधमाशांचा उपयोग येतो त्यामुळे परागीभवन होवून चांगली फल धारणा ( दाणे भरतात ) यासाठी मधमाशांच्या पेटया ५ प्रतिहेक्टरी सुर्यफुल पिकांत ठेवाव्या . पीक फुलो – यात असतांना शक्यतो कोणतेही किटकनाशक फवारू नये .

उत्पादन:-

सुधारीत वाणाचे १० ते १२ क्विंटल प्रतिहेक्टरी व संकरीत वाणाचे १८ ते २० क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन मिळते.

प्रा. संजय बाबासाहेब बड़े सहाय्यक प्राध्यापक (कृषि विद्या)

दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगांव

ता वैजापूर जि.औरंगाबाद. मो. नं. ७८८८२ ९ ७८५९

suryaful lagwd

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading