कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त शून्य मशागत तंत्रज्ञान
21-11-2023

कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त शून्य मशागत तंत्रज्ञान
कोरडवाहू शेतीत खूपच अशाश्वतता आहे.
कोरडवाहू शेतीत पावसाचे दिवस कमी असतात. एकावेळी भरपूर पाऊस पडतो, तर दोन पावसाचे सत्रास भरपूर अंतर पडल्याने काही काळ जास्त पाण्याने तर काही काळ ओलाव्याच्या दुर्भिक्षामुळे पिके वाळतात, उत्पादनातच घट येते अगर नापिकी होते. कोरडवाहू क्षेत्रात जमीन धारणा मोठी आहे. सेंद्रिय खताचा वापर करणे शक्य होत नाही. सेंद्रिय कर्बाची टक्केवारी कमी झाली आहे. यामुळे जमिनीची जलधारणशक्ती कमी आहे. बाहेरून संरक्षित पाणी देण्याच्या कोणत्याही सुविधा नाहीत. सरकार म्हणते या क्षेत्रात शेतकऱ्यांनी शेततळ्यांची सुविधा निर्माण करावी. त्यावर ठिबक चालवावे. परंतु केवळ थोड्या काळासाठी आणि क्रयशक्ती अभावी अशा योजना राबविणे शक्य नसते.
कोरडवाहू क्षेत्रात कापूस, तूर ही मुख्य लांब अंतरावरील पिके असून, त्यामध्ये मूग, उडीद, सोयाबीनसारखी कमी मुदतीची मिश्रपिके घेतली जातात. मुख्य पिकांची शाश्वती नसते, त्या ठिकाणी अल्प मुदतीचे मिश्र पिके तरी हाती लागावीत, हा उद्देश असतो. अशी पीक रचना उभी करण्यासाठी पूर्वमशागत करावी लागते. यामुळे बैल अगर ट्रॅक्टरचलित यंत्राने पेरणी करणे शक्य होते. खर्चिक तंत्रे या ठिकाणी उपयोगी नाहीत. त्यामुळे प्रथम बागायत क्षेत्रात शून्य मशागत शेती यशस्वी झाल्यानंतर या तंत्राचा लाभ कोरडवाहू क्षेत्राला कसा देता येईल, यावर चिंतन सुरू झाले.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रथम जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढविणे गरजेचे होते. पारंपरिक मार्गाने ही गोष्ट केवळ अशक्य होती. मग मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष हेच पुढील पिकासाठी सेंद्रिय खत, हे शून्य मशागतीचे तंत्र या ठिकाणी बरोबर जमले. जमिनीखालील अवशेष कुजण्यास जड असतात. ते दीर्घकाळ जागेला कुजत राहिल्याने जमिनीची कण रचना सुधारली, निचरा शक्ती सुधारली, कमी वेळात जास्त पाऊस झाल्यास लवकर वापसा आल्याने त्याचा पिकाला त्रास झाला नाही. जमिनीत सेंद्रिय कर्बात वाढ झाली. यामुळे जलधारण शक्ती वाढली.
दोन पावसाच्या सत्रात अंतर पडल्यास पिकाला गरजेइतके पाणी यातून उपलब्ध झाल्याने पीक २५ ते ३० दिवसांच्या काळात वाळले नाही. जमीन न नांगरता पेरल्याने पोकळ झाली नाही. नांगरून पोकळ केलेल्या जमिनीतील ओलावा जितका जलद उडून जातो तितका विना नांगरणीच्या बसलेल्या जमिनीतील उडून जाऊ शकत नाही. यामुळे पिकाला उघडिपीत दीर्घकाळ ओलाव्याची तरतूद झाली.
अस्थिर सेंद्रिय कर्बाची तरतूद
जमिनीमध्ये स्थिर सेंद्रिय कर्ब आणि अस्थिर सेंद्रिय कर्ब उपलब्ध असतो. वरील तंत्रातून स्थिर सेंद्रिय कर्ब मिळाला. याचा फायदा झालाच, परंतु यापेक्षा जास्त फायदा मिळविण्यासाठी अस्थिर सेंद्रिय कर्बाची तरतूद करणे गरजेचे वाटले. यासाठी सहज कुजणाऱ्या पदार्थांची उपलब्धता करणे भाग होते.
येथे ज्या जागी वापरायचा त्याच जागी तो निर्माण करण्याचे तंत्र विकसित करणे गरजेचे होते. लांब अंतरावरील कापूस व तूर या पिकात कोणतीही मिश्रपिक न घेता मुख्य पिकाला त्रास होणार नाही, असे युक्तीने तण वाढवायचे आणि योग्य वेळी एखाद्या अवजाराने झोपवून तणनाशकाने मारायचे असे सुरुवातीचे नियोजन होते. यातून विविध प्रकारच्या कच्च्या मालापासून अस्थिर सेंद्रिय खत निर्मिती होईल आणि आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकून राहील.
पारंपरिक पद्धतीत प्रथम डवरणी अगर कोळपणी आणि नंतर निंदणी अगर भांगलणी यातून शेती तणमुक्त करण्याची प्रथा आहे. इथे हाताच्या बोटाच्या चिमटीत तण धरणे शक्य झाले, की लगेच भांगलणी सुरू केली जाते. मी तणे शक्य तितकी मोठी करून (मुख्य पिकाला त्रास होणार नाही अशी) वाढवून मारण्याचे तंत्र विकसित केल्याने दोन पिकांच्या ओळीत तणाचा पट्टा तयार झाला. मध्यंतरी एखादा पाऊस झाल्यास या तणाच्या मुळांच्या जाळीत खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साठविले जाते. जे पुढे पिकाची ओलाव्याची गरज ५० ते ६० दिवस सहज भागवू शकते. प्रत्येक पिकाला लागणाऱ्या पाण्याचे शेततळे त्याच्या मुळापाशी असा फायदा होतो. पिकाने आपल्या गरजेप्रमाणे त्याचा वापर करावयाचा.
तणांच्या मुळांमुळे जमिनीची आपोआप मशागत होते. ओलावा दीर्घ काळ मिळणार असल्याने कोरडवाहूमध्ये लांब मुदतीच्या जातींची लागवड शक्य होते. तूर अगर कपाशी ही पिके अशी आहेत, की ज्याची ठरावीक वाढ झाल्यानंतर फूलधारणा व फळधारणा होते. यासाठी पिकाच्या उत्तर काळात ओलावा टिकणे गरजेचे असते. नेमका याच वेळेस पाऊस जातो आणि पिकाचे नुकसान होते.
जमिनीत सेंद्रिय पदार्थ कुजविणारी जिवाणूसृष्टी वाढविणे हा सुपीकतेसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. या कच्च्या मालात सहज, मध्यम व दीर्घ मुदतीने कुजणारे पदार्थ असावेत. कुजविणाऱ्या जिवाणूसृष्टीपैकी जास्तीत जास्त प्रजातींना अन्न उपलब्ध झाल्याने जमिनीत जैववैविध्य पूर्ण क्षमतेने वाढते. याचे फायदे अनेक आहेत. कपाशी व तूर या पिकाची सोटमूळे खोलवर जातात. काढणी पूर्ण झाल्यानंतर जमिनीबरोबर झाडे कापून काढावीत, मुळांचा पसारा तसाच ठेवावा.
पुढील पीक तणाच्या पट्ट्यात घ्यावे आणि पिकाच्या पट्ट्यात तणाचा पट्टा करावा. कापलेली सोटमुळे परत फुटू लागल्यास तणनाशकाने मारावीत. पुढील वर्षी या खोलवर गेलेल्या मुळाला धरून जमिनीत पाणी खोलवर पाझरते. मूलस्थानी जलसंवर्धन होते, भूजल पाणीपातळीही वाढू शकते. एका ठिकाणी खूप मोठ्या क्षेत्रावर हा प्रयोग झाल्यास लांबकानी गावाप्रमाणे पुढील आठ महिन्यांतील पाणीटंचाईवर मात करता येऊ शकेल. यासाठी गावाची एकी हेच मुख्य भांडवल.
शेतकऱ्यांना मध्यम मुदतीने काही पैसा गरजेचा असतो. म्हणून मिश्र पिकाचे नियोजन असते. मुख्य पिकात मिश्रपिक नको. मिश्र पिकासाठी काही क्षेत्र बाजूला ठेवा, त्याची वखराची पाळी देऊन पेरणी करा आणि नेहमीप्रमाणे व्यवस्थापन करून ते पीक घ्या. केव्हा तरी तणे व अवशेष कुजून तयार झालेले रान अल्प मुदतीच्या पिकाच्या फेरपालटासाठी बदलून वापरा. आपण एकाच दगडात अनेक पक्षी मारतो. हा झाला बदलातील पहिल्या काही वर्षांतील विचार. संशोधन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. यापेक्षा आणखी काही चांगले आहे का यासाठीची शोधयात्रा पुढे चालूच राहिली.
पहिल्या टप्प्यात तण मोठे करून झोपवून तणनाशकाने मारावे असे म्हटले आहे. जुने तण असे मारण्यापेक्षा हे तण प्रथम कापून टाकावे, यासाठी ब्रश कटरचा वापर करावा. ज्यांचे क्षेत्र मोठे आहे त्यांच्यासाठी ट्रॅक्टरवर चालणारे ब्रश कटर आता उपलब्ध आहेत. पुढे येणाऱ्या कोवळ्या फुटीवर तणनाशक फवारणी करणे सोपे होते. हा झाला दुसऱ्या टप्यातील विचार. यापुढे हे तण न मारता जिवंत ठेवणे जास्त फायदेशीर आहे हा विचार पुढे आला. यामध्ये फक्त कापून तणाची वाढ खुंटविणे व मुख्य पिकाला वाढू देणे महत्त्वाचे होते. तण आणि पिकाचा रानात सहयोग असावा. दोघांनी एकमेकांशी स्पर्धा करून अन्नसेवन करावे.
शेती तणमुक्त ठेवल्यास पिकाचे फाजील पोषण होते आणि ते रोग किडीला बळी पडते. दोन पानांमधील खोडाची लांब जास्त लांब होत आहे, असे वाटल्यास ही वाढ सशक्त मानू नये, असे काही परस्पर विरुद्ध विचारावर चिंतन चालू आहे. शून्य मशागतीवर एकही तणनाशकाची फवारणी न करता हेक्टरी ४५ ते ५० क्विंटल विक्रमी पीक सातत्याने घेतल्याची उदाहरणे आहेत. बाकी मशागत करणारे शेतकरी तणनाशके फवारून बेजार झाले आहेत.
एका शेतकऱ्याने कळविले आहे, की नेहमी पावसाळ्याच्या अखेर विहिरीची पाणीपातळी १० ते १५ फूट खाली असायची. यंदा पाऊस कमी असून, विहीर काठोकाठ भरली आहे. हा काही चमत्कार नाही तर विज्ञान आहे. पारंपरिक शेतीतील पद्धतीच्या परस्पर विरोधी विचार असल्याने शेतकरी वर्ग तंत्र स्वीकारण्यात अडखळतात. परंपरावाद्यांचा विरोध हा मोठा अडथळा आहे. प्रथम थोड्या क्षेत्रावर प्रयोग करून या विषयातील तज्ज्ञता प्राप्त करावी हा यावरील मार्ग आहे. आपल्याला स्वतःच्या पायावरच उभे राहण्यास शिकले पाहिजे.