पंजाबराव डखांनी वर्तवला तातडीचा अंदाज, पुढील 3 दिवस राज्यात तुफान पाऊस पडणार
08-07-2024

पंजाबराव डखांनी वर्तवला तातडीचा अंदाज, पुढील 3 दिवस राज्यात तुफान पाऊस पडणार
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हवामानाचा नवीन अंदाज वर्तवला आहे. पुढील 3 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पंजाबराव डखांनी वर्तवला आहे.
सध्या राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हवामानाचा नवीन अंदाज वर्तवला आहे. पुढील 3 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पंजाबराव डखांनी वर्तवला आहे.
दरवर्षी 10 ते 15 जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस होत असतो
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचे डख म्हणाले. राज्यात 4 ते 11 जुलैपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज आपण वर्तवला होता असे डख म्हणाले. दरवर्षी 10 ते 15 जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस होत असतो. यावर्षी जुलै महिन्यात खूप चांगला पाऊस पडणार असल्याचे डख म्हणाले. यावर्षी जुलै महिन्यात दोन लो प्रेशर येणार आहेत, त्यामुळं चांगला पाऊस पडणार आहे. राज्यात 13 जुलैपासून 25 जुलैपर्यंत दोन कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहेत. त्यामुळं चांगला पाऊस पडणार आहे.
नदी नाले ओढू भरुन वाहणार
बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत. अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी फवारणी करावी असे पंजाबराव डख म्हणाले. एकदम राज्यातील पाऊस कमी होणार नाही. भाग बदलत पाऊस पडत राहणार असल्याची माहिती पंजाबराव डखांनी दिली आहे. मात्र, 7, 8 आणि 9 जुलैला राज्यात मुसळधार पाऊस पडून नदी नाले ओढू भरुन वाहणार असल्याचे पंजाबराव डख म्हणाले.
नवी मुंबईसह ठाणे , पनवेल पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
दरम्यान, आज नवी मुंबईसह (Navi Mumbai) ठाणे (Thane), पनवेल (Panvel) परिसरात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळं सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं असून, अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच अनेकांच्या चारचाकी आणि दुचाकी वाहून गेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तर काही नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच घरात पाणी शिरल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. दरम्यान, या पावसाचा लोकल सेवेवर देखील परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळं वाहतुकीत मोठे अडथळे निर्माण झाले होते.