उन्हाळ्यात जनावरांची घ्या अश्या प्रकारे काळजी

15-03-2023

उन्हाळ्यात जनावरांची घ्या अश्या प्रकारे काळजी

उन्हाळ्यात जनावरांची घ्या अश्या प्रकारे काळजी 

जनावरांना चरण्यासाठी उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस पाठवू नये. त्यांना दुपारी हिरवी मका, चवळी, कडवळ, लसूण घास यांसारखी पोषक वैरण द्यावी.

उष्माघात आजारामुळे भयंकर अशक्तपणा येतो, तहान- भूक मंद होते. डोळे लालसर होऊन डोळ्यांतून पाणी गळते, डोळे खोल जातात. या काळात जनावरांच्या आहारामध्ये वाढीव क्षार मिश्रणाचा वापर करावा. गुळाचे पाणी पाजावे. नियमित वेळाने स्वच्छ व थंड पाणी प्यायला द्यावे.

जनावरांच्या उत्तम वाढीसाठी व आरोग्यासाठी वातावरणामध्ये त्यांची योग्य काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यातील मुख्य आजार म्हणजेच उष्माघात. ज्या भागांत तापमान ४५ अंश ते ४६ अंश सेल्सिअसच्यावर जाते, उष्णतेची लाट तयार होते, त्या भागांत हा आजार दिसतो.

जनावरांच्या गोठ्यात प्रमाणापेक्षा जास्त आर्द्रता आणि वायुविजनाची योग्य सोय नसणे; तसेच जनावरांची (गर्दी) संख्या जास्त असणे, बैलांना भर उन्हात खूप अंतर ओढायला लावल्यास, जनावरांची वाहतूक करताना वाहनात जास्त जनावरे भरून त्यांना वेळोवेळी पाणी न पाजल्यास, उन्हाच्या झळा लागल्यास किंवा जनावरे उन्हात बांधल्यास उष्माघात होण्याची दाट शक्‍यता असते.

लक्षणे

  • आजारामुळे भयंकर अशक्तपणा येतो, तहान- भूक मंद होते.
  • स्पंदन जलद पण उथळ श्‍वसनक्रिया होते.
  • डोळे लालसर होऊन डोळ्यांतून पाणी गळते, डोळे खोल जातात.
  • तोंडास कोरड पडते, जनावर तोंडाचा ‘आ’ वासते, तोंड उघडे ठेवते.
  • धाप लागते.
  • अतिसार होतो. 
  • नेहमीपेक्षा वेगळा किंवा असामान्य लाळस्राव, चक्कर येणे, त्वचा खरखरीत होते.
  • लघवीचे प्रमाण कमी होते. 
  • शरीराचे तापमान ११० अंश फॅरानहाइटपर्यंत वाढते.

प्रथमोपचार

  • नियमित वेळाने (उन्हाळ्यात तीन ते चार वेळेस) स्वच्छ व थंड पाणी प्यायला द्यावे.
  • पाणी उपलब्ध असल्यास थंड पाण्याने स्वच्छ धुऊन काढावे.
  • झाडाच्या सावलीत थंड ठिकाणी जनावरे बांधावीत.
  • शरीराचे तापमान हळूहळू उतरेल याची काळजी घ्यावी.
  • गोठ्यामध्ये गाईच्या अंगावर थंड पाणी फॉगरच्या साह्याने शिंपडावे.
  • उष्माघात होऊ नये यासाठीची काळजी म्हणून संपूर्ण दिवस व रात्र थंड व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
  • उन्हाळ्यामध्ये जनावरांना तीन - चार वेळा थंड व स्वच्छ पाणी पाजावे.
  • जनावरे उन्हात बांधू नयेत. बांधण्याच्या जागी आर्द्रतेचे प्रमाण जास्त असू नये. 
  • जागा हवेशीर असावी.
  • गोठ्यामध्ये थंड जागी किंवा झाडाखाली बांधावे. 
  • गोठ्याच्या छपरावर गवत, पालापाचोळा टाकून पाणी शिंपडावे, त्यामुळे गोठा थंड राहतो. 
  • गोठयाच्या कडेला पोते ओले करून बांधावे. त्याने गोठ्यात थंड हवा राहते.
  • गोठ्यात जनावरांची गर्दी असू नये.
  • आहारामध्ये वाढीव क्षार मिश्रणाचा वापर करावा. त्याचबरोबर जनावरांना गुळाचे पाणी पाजावे.
  • जनावरांना चरण्यासाठी उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस पाठवू नये. त्यांना दुपारी हिरवी मका, चवळी, कडवळ, लसूण घास यांसारखी पोषक वैरण द्यावी. जेणेकरून दूध उत्पादनात सातत्य टिकून राहील. प्रजनन क्षमताही सुधारेल. 
  • खाद्यातून अ जीवनसत्त्वाचा पुरवठा करण्यासाठी जास्तीत जास्त हिरवा चारा द्यावा. 
  • रात्री व पहाटेच्या वेळी वाळलेली वैरण भरपूर द्यावी.
  • गोठ्यामध्ये तसेच जनावरांवर अधूनमधून थंड पाणी फवारावे.
  • जनावरांना लाळ्या खुरकूत व फऱ्या यांसारख्या रोगांची रोगप्रतिबंधक लस योग्य वेळी टोचून घ्यावी.

प्रणिता सहाणे, (सा. प्राध्यापक, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, गुंजाळवाडी पठार, संगमनेर, जि. नगर)

source : agrowon

First aid for heatstroke in animals

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading