केंद्रीय अर्थसंकल्प 2024…
11-01-2024

केंद्रीय अर्थसंकल्प 2024…
अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेचा हफ्ता वाढणार का?
केंद्रीय अर्थसंकल्प 2024 ला आता एक महिन्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. सर्वांच्या नजरा 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर खिळल्या आहेत. या अर्थसंकल्पाकडून देशातील शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. राज्याच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे मोठे योगदान आहे.
अर्थसंकल्प 2024 मध्ये शेतकरी कर्जमाफी आणि किमान आधारभूत किंमत मिळावी या मागणीवर ठाम आहेत. लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. त्यामुळे केंद्र सरकार शेतकऱ्यांना एक फूल नव्हे तर फुलांची पाकळी देईल अशी अपेक्षा बळीराजा करत आहे. नवीन वर्ष 2024 मध्ये केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना, पीएम किसानच्या हप्त्यात वाढ करण्याची अपेक्षा आहे.
तीन ऐवजी चार हफ्ते होणार!
केंद्र सरकार पीएम किसान योजनेत एक बदल करू शकते. सध्या या योजनेअंतर्गत तीन हप्ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. त्याऐवजी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात चार हप्ते जमा करण्याची शक्यता आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना 6000 रुपयांऐवजी 8000 रुपयांचा हप्ता मिळू शकतो. ही रक्कम प्रत्येक महिन्याला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
ही पण एक शक्यता
सूत्रानुसार, पीएम किसान योजनेत घसघशीत वाढ होऊ शकते. वार्षिक 6000 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या या योजनेतंर्गत तीन टप्प्यात 6000 रुपये जमा होतात. ही रक्कम वाढण्याची दाट शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांना ही रक्कम वाढवण्याची मागणी केली होती. हा हप्ता 50 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे 2000 रुपयांऐवजी योजनेचा हप्ता 3000 रुपये असेल. सध्या दोन हजार रुपये तीन हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. त्याऐवजी 3000 रुपयांचे तीन हप्ता जमा करण्यात येतील.
शासनाच्या तिजोरीवर ताण
एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेंतर्गत रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयासमोर ठेवण्यात आला आहे. केंद्राने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास सरकारी तिजोरीवर 20,000-30,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. परंतु आगामी निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकार त्यावर शिक्कामोर्तब करू शकते.
16 वा हफ्ता लवकरच जमा होणार…
पीएम किसान योजनेचे 15 हफ्ते जमा झाले आहेत. योजनेचा 16 वा हफ्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. माध्यमांच्या वृत्तानुसार, या योजनेअंतर्गत फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.