महाराष्ट्रात 30 जूनपर्यंत जोरदार पावसाचा इशारा, कोणत्या विभागात कसं असेल हवामान?
24-06-2024

महाराष्ट्रात 30 जूनपर्यंत जोरदार पावसाचा इशारा, कोणत्या विभागात कसं असेल हवामान?
मान्सूनने (Monsoon) आज संपूर्ण महाराष्ट्र काबिज केला आहे. सध्या मान्सूनचा काही प्रमाणात वावर हा घाटमाथ्यावर जाणवू लागला आहे. त्यामुळं आजपासून जूनच्या या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात म्हणजे 30 जून पर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे मत ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी व्यक्त केलं आहे.
मुंबईसह संपूर्ण कोकण
गेल्या पाच दिवसापासून म्हणजे 18 जूनपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. जूनच्या ह्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता ही अजुनही कायम टिकून आहे. तर मुंबई शहर, उपनगर, व कोकणात ह्या आठवड्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे माणिकराव खुळे म्हणाले.
विदर्भ
गेल्या चार दिवसापासून म्हणजे 20 जूनपासून संपूर्ण विदर्भातील 11 जिल्ह्यात, पावसाने मध्यम ते जोरदारपणे हजेरी लावली आहे. मान्सून बंगालच्या उपसागरीय शाखेच्या सक्रियतेमुळं आता जूनच्या ह्या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात सुद्धा संपूर्ण विदर्भात जोरदार पावसाची शक्यता ही कायम टिकून आहे.
मध्य महाराष्ट्र
मान्सून बंगालच्या उपसागरीय शाखात सक्रिय झाल्यामुळे मान्सून अरबी समुद्रीय शाखाही काहीशी उर्जीतावस्थेत आली आहे. त्यामुळे मान्सून साधारण एक किमी. उंचीचा सह्याद्री घाट चढून घाट माथ्यावर वावरतांना जाणवत आहे. त्यामुळे मान्सून खान्देश, नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा 10 जिल्ह्यात आजपासुन जूनअखेर पर्यंतच्या संपूर्ण आठवड्यात मध्यम ते जोरदार, पावसाची शक्यता जाणवते. नाशिक, नगर, पुणे व छत्रपती संभाजीनग अशा चार जिल्ह्यांच्या काही भागात जून अखेरपर्यंतच्या आठवड्यात, सरासरीपेक्षा, महाराष्ट्रातील उर्वरित भागाच्या तुलनेत, पावसाचे प्रमाण, काहीसे, कमी असण्याची शक्यता जाणवते असे खुळे म्हणाले.
मराठवाडा
मराठवाड्यातील सर्व 8 जिल्ह्यात आजपासून पुढील चार दिवस म्हणजे 26 जूनपर्यन्त केवळ मध्यम पावसाचीच शक्यता आहे. तर 27 ते 30 जूनच्या चार दिवसात मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता उर्वरित 7 जिल्ह्यात पावसाचा जोर वाढू शकतो. धाराशिव, लातूर अशा दोन जिल्ह्यात व लगतच्या परिसरात तर कदाचित आजपासूनच जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.
खरीप पिके व पेरी संबंधी ह्या पावसाची उपयुक्तता काय असु शकते?
पेर झालेल्या पिकांना जीवदान, तर नापेर ठिकाणी पेर होण्याची शक्यता ह्या आठवड्यातील पावसाने मिळू शकते, असे माणिकराव खुळे म्हणाले. नजिकच्या काळात ह्यापेक्षा अधिक चांगल्या पावसाची शक्यता आहे. 29 जून ते 6 जुलै दरम्यानच्या आठवड्यात कदाचित महाराष्ट्रात अधिक चांगल्या पावसाची शक्यता जाणवते असे खुळे म्हणाले.