मराठवाडा आणि विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
21-04-2024

मराठवाडा आणि विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कमाल तापमान हंगामातील सर्वोच्च पातळीवर पोहोचले. राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अकोलामध्ये या हंगामातील सर्वाधिक तापमान 44 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
आज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
विदर्भापासून कर्नाटक गोव्याच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर दक्षिण कर्नाटक, दक्षिण तामिळनाडूपर्यंत वाऱ्यांचे प्रवाह खंडीत झाले आहेत. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान आहे.
आज (ता. २१) मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि गडचिरोली येथे तुरळक ठिकाणी वादळी वीज, वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे.
शनिवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या 24 तासांत 44 अंश सेल्सिअस इतके या हंगामातील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. अकोला, चंद्रपूर, वाशिम, जळगाव आणि ब्रह्मपुरी येथे 43 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. आज (ता. 21) दिवसभर ढगाळ वातावरण आणि सूर्यप्रकाश राहण्याची शक्यता आहे.
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड लातूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली.
42 अंशांपेक्षा जास्त तापमानः
अकोला ४४.०, चंद्रपूर ४३.८, वाशीम ४३.६, जळगाव ४३.२, ब्रह्मपूरी ४३.१, अमरावती ४२.८, धुळे ४२.५, वर्धा ४२.५, यवतमाळ ४२.५